नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : डिजिटल कॉमर्स सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ होत आहे. आता अमेरिकेतील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपी मॉर्गननंही या गोष्टीचा फायदा घेण्याची तयारी केली आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेली ही बँक आता आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहे. आशियाई बाजारपेठेतील विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी कार्ड ट्रान्झॅक्शन्स आणि इतर पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँक करणार आहे. जेपी मॉर्गन आशियाई बाजारपेठेत यासाठी कर्मचारी नियुक्ती सुरू करत आहे. जेपी मॉर्गन आता ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये पेमेंट बिझनेस सेवा प्रदान करणार आहे. 2022 च्या अखेरीस ही बँक हाँगकाँगच्या बाजारपेठेतही पोहोचेल. बँकेच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “बँक अनेक नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.” पेमेंट बिझनेसमध्ये बँकेसाठी संधी - जेपी मॉर्गनच्या पेमेंट बिझनेसमध्ये ट्रेझरी सर्व्हिस, ट्रेड, कार्ड आणि मर्चंट सर्व्हिस यांचा समावेश होतो. या माध्यमातून बँकेचे ग्राहक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणालाही पेमेंट करू शकतात. आशियातील ई-कॉमर्सच्या तेजीमुळे आता छोटे व्यापारीही डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत आहेत. अशा ग्राहकांचा बँक आणि फिनटेक कंपन्यांना फायदा होईल.
आशियातील मार्केटमध्ये मोठी संधी - बँकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतातील बाजारपेठेमध्ये भरपूर क्षमता आहे. भारताचा आकार तर मोठा आहेच शिवाय येथे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा वापर होतो. वाढत्या ई-कॉमर्समुळे जपान देखील बँकेच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियात क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने तिथेही बँकेला मोठी संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय सिंगापूर आणि हाँगकाँग हे देशही महत्त्वाचे ठरणार आहेत. हेही वाचा - Moonlighting : बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली शेवटची वॉर्निंग, Email चर्चेत चीनमधील बाजार पेठेवरही असणार लक्ष - Alipay आणि Wechat Pay सारख्या स्थानिक कंपन्यांचं चीनी पेमेंट मार्केटमध्ये वर्चस्व आहे. चीनमध्ये परदेशी बँकेला परवाना मिळवणं सोपं नव्हतं. मात्र, येथेही जेपी मॉर्गन बँकेनं स्थानिक कंपनीशी करार केला आहे. येत्या काळात बँकेने येथे विस्ताराची तयारी केली आहे. अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, भविष्यात बँक चीनमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करेल. परंतु, सध्या तिचे लक्ष सात नवीन बाजारपेठांवर केंद्रित आहे.