दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाच्या वाढत्या संकटात आता Health Insurance सुद्धा महागणार?

दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाच्या वाढत्या संकटात आता Health Insurance सुद्धा महागणार?

विमा कंपन्या आरोग्य विम्याचा (Health Insurance) प्रीमियम वाढवण्याच्या तयारीत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोनाने सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं कंबरडं मोडलं आहे आणि आर्थिक परिस्थिती अगदीच बिकट करून टाकली आहे. त्यात आता या मध्यवर्गीय माणसाला आणखी एक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात सध्या कोरोना महासाथीची दुसरी लाट (Coronavirus second Wave) आली आहे. त्यामुळे विविध विमा कंपन्यांकडे कोरोनासंबंधी 15 हजार कोटी क्लेम आले आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना आजार राहणार हे लक्षात घेऊन विमा कंपन्या आरोग्य विम्याचा (Health Insurance) प्रीमियम वाढवू शकतात. या कंपन्यांनी (insurance companies) त्याबद्दल पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

कोरोनामुळे इन्शुरन्स कंपन्यांकडे आलेले क्लेम मोठ्या प्रमाणात वाढले असूनही कंपन्यांनी प्रीमियम वाढवलेले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण आहे. विविध विमा कंपन्यांनी एकत्रितपणे विमा नियामक IRDAI कडे आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 10 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. कोविड-19 महामारी आल्यानंतर कंपन्यांकडे येणाऱ्या क्लेममध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे आरोग्य विम्यामध्ये कोविड 19 सेस म्हणून वाढीव 10 टक्के रक्कम आकारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे.

हे वाचा - कोरोनामुळे विविध राज्यातील ट्रेन्स होणार बंद? रेल्वेने दिली ही माहिती

सध्या देशात दररोज 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत असून, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अवस्था प्रचंड बिकट आहे. आयआरडीएआयने जर विमा कंपन्यांची शिफारस मान्य केली तर सर्वसामान्यांच्या खिशांवर थेट परिणाम होईल. आरोग्य विम्याचा प्रीमियम महागेल.

बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख गुरदीप बत्रा म्हणाले, "कोरोनाकाळात नेहमीच्या तुलनेत विमा कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात क्लेम पूर्ण करावे लागले आहेत. कोरोनावरील उपचारांच्या किमती वाढतच आहेत. मेडिकल क्षेत्राशी संबंधित सेवा आणि उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसी महागणार आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि विमा कंपन्यांना कोविडसाठी मोठ्या प्रमाणात क्लेम द्यावे लागले आहेत. त्यामुळे प्रीमियम वाढवण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.’

हे वाचा - कोरोना काळात नोकरीची चिंता? 50 हजारात हा व्यवसाय सुरू करून मिळवा लाखोंचा नफा

कंपन्यांनी त्यांचं मत विमा नियामकाकडे मांडलं आहे त्यावर विचार करून नियामक आपला निर्णय देईल. त्यानंतर विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ होऊ शकते. पण ही वाढ झाली तर आधीच कोरोना महासाथीच्या परिणामांमुळे मोकळ्या झालेल्या सामान्य माणसाच्या खिशावर प्रचंड ओझं येणार आहे.

First published: April 17, 2021, 5:53 PM IST

ताज्या बातम्या