नवी दिल्ली, 1 जुलै : सोनं खरेदी ही अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. पण आता सोनं खरेदी करणाऱ्यांना सरकारनं एक जोरदार झटका दिला आहे. एकीकडे महागाईनं उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक गोष्टी तर महाग झाल्या आहेतच; पण आता सोन्या-चांदीच्या आधीच जास्त असलेल्या किंमती आता आणखी वाढणार आहेत. सोने –चांदीच्या आयातीवर (Gold-Silver Import Duty) लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. टीव्ही 9 भारतवर्षच्या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानं अर्थातच सोनं खरेदी आता आणखी महागणार आहे. सरकारनं सोन्यावरील बेसिक आयात शुल्कामध्ये (Basic Import Tax) 5 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आधी 7.5 टक्के असलेला हा कर आता 12.5 टक्के इतका झाला आहे. सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या दरानं नीचांक गाठला आहे. तसंच देशातील व्यापारामध्ये तोट्याचं प्रमाणही सातत्यानं वाढत आहे. मे महिन्यात उद्योग व्यापारातील हे नुकसान 24. 29 बिलियन डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळेच सरकारनं सोन्यावरील आयात कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून अनेक नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल? भारतानं गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यांत जास्त सोनं 2021 मध्ये आयात (Gold Import) केलं होतं. भारतानं मे महिन्यात तब्बल 6.03 अब्ज डॉलर किंमतीचं सोनं आयात केलं होतं. ही आयात 2020च्या तुलनेत 9 पट जास्त असल्याची माहिती आहे. खरंतर कोरोनाच्या साथीमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली होती. लोकांनीही सोन्याची भरपूर खरेदी केली होती. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी देशातील मोठ्या ज्वेलर्सनं इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती. खरंतर सोन्यावरील 7.5 टक्के असलेली इम्पोर्ट ड्युटी कमी करून 4 टक्के करण्याची मागणी या ज्वेलर्सची होती; पण सरकारनं उलट त्यामध्ये वाढच केली आहे. LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात; नवीन दरानुसार किती स्वस्त मिळेल सिलेंडर भारत हा जगातील सोन्याचा दोन क्रमांकाचा ग्राहक आहे. एकीकडे भारतानं सोन्यावरील आयात कर वाढवला आहे. तर दुसरीकडे चीन,अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांनी सोन्याच्या आयातीवरील इम्पोर्ट ड्युटीच काढून टाकली आहे. स्थानिक बाजारपेठ अधिक मजबूत करण्यासाठी या देशांनी हा निर्णय घेतला. मात्र भारतात सोन्याला प्रचंड मागणी असूनही सरकारच्या वतीने कर वाढवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.