दिब्रुगड, 15 फेब्रुवारी: आसामच्या (Assam) दिब्रुगड जिल्ह्यात (Dibrugarh District) सोमवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या चहापातीच्या (Tea Leaf) लिलावादरम्यान एका खास चहासाठी 99,999 रुपये प्रति किलो एवढ्या दराची बोली लागली. देशातल्या एखाद्या चहाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी वेळ आहे, की एका विशिष्ट राज्यातल्या चहाचा 99,999 रुपये प्रति किलो दराने लिलाव झाला आहे, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या विशेष चहाचं नाव गोल्डन पर्ल (Golden Pearl) असं असून, त्याचे मालकी हक्क एएफटी टेक्नो ट्रेडकडे (AFT Techno Trade) आहेत. आसाम टी ट्रेडर्सने (Assam Tea Traders) सोमवारी प्रतिकिलो 99,999 रुपये बोली लावून त्यांच्याकडून हा चहा खरेदी केला. या वृत्ताला दुजोरा देताना गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरचे सचिव प्रियांजू दत्ता म्हणाले, `आसाम टी ट्रेडर्सने 99,999 रुपये प्रतिकिलो दराने स्पेशल चहा खरेदी केला आहे. आसाममधल्या विशेष आणि महागड्या चहाचे खरेदीदार अशी आसाम टी ट्रेडर्सची ओळख आहे. ‘टी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या आसाम युनिटचे सचिव दीपांजोल डेका यांनी सांगितलं, ‘गोल्डन पर्ल नावाचा हा हँडमेड चहा (Handmade Tea) असून, ही चहाची अत्यंत नाजूक अशी व्हरायटी आहे. याचं उत्पादन दिब्रुगड विमानतळाजवळ लाहोवाल इथल्या नाहोरचुकबारी इथे घेण्यात आलं. हा चहाचा एक दुर्मीळ प्रकार आहे. हा चहा लिलावाच्या दिवशी सेल नंबर 7 आणि लॉट नंबर 5001मध्ये सादर करण्यात आला होता.’ हे वाचा- ₹6 चा हा स्टॉक 150 रुपयांवर! गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे एका वर्षात झाले 24 लाख गेल्या वर्षीही आसाममध्ये मनोहरी गोल्ड (Manohari Gold Tea) नावाच्या खास चहाचा लिलाव 99,999 रुपये प्रतिकिलो दराने झाला होता. हा चहा मनोहरी टी इस्टेटद्वारा उत्पादित केला जातो. म्हणून त्याचं नाव मनोहरी गोल्ड असं आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी गुवाहाटीमधल्या चहाच्या लिलावात सौरभ टी ट्रेडर्सने हा चहा खरेदी केला होता. तेव्हापासून हा देशातला सर्वाधिक किमतीचा चहा ठरला होता; मात्र आता त्याच्यासोबत गोल्डन पर्लही यासाठी ओळखला जात आहे. हे वाचा- Share Market मध्ये मोठी उसळी, Sensex 1736 अंकांनी वधारला तर निफ्टी 17352 अंकावर देशातल्या चहाच्या अन्य महागड्या प्रकारांविषयी बोलायचं झालं, तर ऑगस्ट 2021मध्ये अरुणाचल प्रदेशातल्या (Arunachal Pradesh) डोनी पोलो टी इस्टेटने उत्पादित केलेला गोल्डन नीडल आणि आसाममधल्या डिकॉम टी गार्डनमधला गोल्डन बटरफ्लाय या चहाची वेगवेगळ्या लिलावांमध्ये 75,000 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली होती. मनोहरी गोल्ड टी यापूर्वी जुलै 2019 मधल्या लिलावात 50,000 रुपये प्रति किलो दराने विकला गेला होता. ती त्या वेळची विक्रमी किंमत ठरली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.