नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: देशभरामध्ये आज सर्वात उच्च किंमतीला सोन्याची विक्री होत आहे. तर चांदीच्या दरांनी देखील 75 हजारांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींनी उसळी घेतल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Rates Today) प्रति तोळा 225 रुपयांनी वधारले आहेत. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर देखील आज वाढले (Silver Rates Today) आहेत. चांदीच्या किमतीमध्ये आज प्रति किलो 1,932 रुपयांची उसळी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते डॉलरचे घसरलेले मूल्य, देशांच्या केंद्रीय बँकांकडून देण्यात येणारे प्रोत्साहन आणि कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण या सर्व कारणांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, महामारी, राजनीतिक तणाव अशी परिस्थिती असेल, तर या काळात सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
सोन्याचे नवे दर (Gold Price On 6th August 2020)
गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचले आहेत. सोन्याचे आजचे भाव 56,590 रुपये प्रति तोळा इतके आहेत. बुधवारी सोन्याचे दर बाजार बंद होत असताना 56,365 रुपये प्रति तोळा इतके होते. यामध्ये 225 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे आजचे भाव 2,045.70 डॉलर प्रति औंस आहेत
(हे वाचा-RBIकडून सामान्यांसाठी खूशखबर! सोन्याच्या दागिन्यांवर मिळणार जास्त कर्ज)
चांदीचे नवे दर (Silver Price On 6th August 2020)
गुरुवारी दिल्लीमध्ये 1 किलो चांदीची किंमत 73,823 रुपयांवरून 75,755 रूपये प्रति किलो झाली आहे. आज चांदीचे भाव 1,932 रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 27.57 डॉलर प्रति औंस आहे.
का वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती?
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये उसळी आल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.
(हे वाचा-याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 90 दिवसात 700% नफा, तुमचाही होऊ शकतो फायदा)
रिलायन्स सिक्योरिटीजचे सीनियर रिसर्च अनालिस्ट श्रीराम अय्यर यांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होण्याऱ्या रिकव्हरीबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याचा परिणाम सोन्याच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत किंमतीवर होत आहे.