नवी दिल्ली, 22 मे : सोने दरात मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या घसरणीवर काहीसा लगाम लागला आहे. शुक्रवारी सोने दर वाढीसह बंद झाला. यूएस डॉलरमध्ये झालेली घसरण हे यामागचं कारण आहे. कमजोर भारतीय रुपयाने मल्टी कमॉडिटी एक्सचेंजसारख्या देशांतर्गत निर्देशांकांवर सोन्याला नफा मिळवण्यास मदत केली आहे.
जागतिक शेअर बाजारातील सततच्या घसरणीने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची किंमत आणखी मजबूत केली आहे. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात अशाच काही फॅक्टर्सबाबत माहिती देण्यात आली आहे, जे नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किमतीवर परिणाम करतील. रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट विपुल श्रीवास्तव यांनी डॉलरची सध्याची स्थिती आणि यूएसच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा परिणाम आणि यूएस मध्यवर्ती बँकेने व्याजदरातील केलेले बदल हे यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं सांगितलं आहे.
डॉलर इंडेक्स -
डॉलरचा परिणाम सोन्याच्या किमतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. जर डॉलरची व्हॅल्यू आणखी घटली तर सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते.
यूएस पहिल्या तिमाहीतील जीडीपी डेटा -
आयआयएफएल सिक्योरिटीजचे रिसर्च उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं, की यूएसच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी डेटा 26 मे 2022 रोजी येईल. जर रिझल्ट खराब आला, तर सोने दरात तेजी पाहायली मिळू शकते.
यूएस फेड बैठक -
अमेरिकेच्या केंद्रीय बँक अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यांनी आधीच व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची कपात करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु या बैठकीनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
रुपया विरुद्ध डॉलर -
अलीकडेच भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळी गाठली होती. जर रुपयाच्या स्थितीत सुधारणा झाली, तर सोन्याचे भावही वाढू शकतील.
इंधन दर -
रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट विपुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या किमती वाढत राहिल्या तर लोक महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतील. युपोपियन युनियनकडून तेलाच्या निर्यातीवर बंदी येण्याची भीती आणि चीनमध्ये लॉकडाउन शिथिल केल्यामुळे तेलाची मागणी आणि किंमत दोन्ही वाढू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.