नवी दिल्ली, 21 मे : वाढत्या महागाईसोबतच सोन्याच्या (Gold Rates) वाढत्या किमती सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय आहेत. दैनंदिन जीवनातील वस्तूंसह सोन्याच्या किमतीतही गेल्या वर्षभरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान, गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) 18 मे रोजी सोन्याचा दर 50218 रुपये, 19 मे रोजी 50544 रुपये, तर 20 मे रोजी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 310 रुपयांनी वाढून 50845 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) दोन दिवसांपासून सोन्याच्या दरांत तेजी आहे. या आठवड्यात स्पॉट गोल्ड 4 डॉलरने वाढून 1845 डॉलरच्या स्तरावर बंद झालं. कमॉडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डॉलर इंडेक्स आणि रुपयाची घसरण याशिवाय जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढली असून, त्याची किंमत वाढू लागली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या तेजीच्या काळात एमसीएक्सवर सोनं 52,100 च्या स्तरावर पोहोचू शकतं आणि स्पॉट गोल्ड प्रति औंस 1780 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलं आहे. मिंटने दिलेल्या एका वृत्तानुसार, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च अॅनॅलिस्ट विपुल श्रीवास्तव म्हणाले, ‘सलग चार आठवडे सोन्याच्या किमतींत घसरण झाली आहे. परंतु, या आठवड्यात सोन्याच्या किमती तेजीसह बंद झाल्या. डॉलर इंडेक्समध्ये या आठवड्यात 1.39 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आणि ती 103.015 च्या स्तरावर बंद झाली. गेल्या आठवड्यात डॉलर निर्देशांक 105 अंकांवर पोहोचला होता. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत झालेल्या विक्रीमुळेही गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत.
हे वाचा - बाबो! 1.3 कोटी रुपयांना विकली गेली एक नोट; इतकं काय आहे यात खास
सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता - अॅक्सिस सिक्युरिटीजचे कमॉडिटी अॅनॅलिस्ट प्रीतम पटनायक यांनी सांगितलं की, सोन्याची किंमत येत्या आठवड्यात 1820 ते 1860 डॉलरच्यादरम्यान राहण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत बाजारात सोन्यासाठी 49500 चा स्तर सपोर्ट म्हणून काम करेल. जर किंमत याच्या खाली गेली तर 48800 रुपयांवर आणखी एक सपोर्ट मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारासाठी हा सपोर्ट 1780 डॉलर असेल. किंमत वाढल्यास देशांतर्गत बाजारात सोनं 51,500 च्या पातळीवर जाऊन 52,100 च्या नवीन स्तरावर पोहोचू शकतं, असंही विपूल श्रीवास्तव म्हणाले. महागाई आणखी वाढणार - दरम्यान, जगभरात महागाई (Inflation) हा चिंतेचा विषय असून, येत्या काळात महागाई आणखी वाढू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत महागाईच्या विरोधात हेजिंगसाठी सोन्याची मागणी वाढू शकते. युक्रेनवरील हल्ल्यामुळे युरोपीय संघाने रशियावर (Russia) घातलेल्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये (China) लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यामुळे इंधनाची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असून त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.