मुंबई, 19 एप्रिल : बजेट एअरलाइन गोएअरने (GoAir) त्यांच्या 5,500 कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक 3 मेपर्यंत बिनपगारी रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत असणार आहे. परिणामी देशातील एअरलाइन्सच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. वाडिया ग्रृपची मालकी असणाऱ्या गोएअरने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर टप्प्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवलं आणि पगारामध्ये कपात देखील केली आहे.
GoAirचे कर्मचाऱ्यांना पत्र
गोएअरच्या मॅनेजमेंटने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे की, लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. परिणामी विमान उड्डाण देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही 3 मेपर्यंत बिनपगारी रजेवर जावे. गोएअरने शनिवारी हे पत्र त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे.
(हे वाचा-सरकारी पेन्शनमध्ये होणार 20 टक्के कपात? अर्थ मंत्रालयाने दिलं हे स्पष्टीकरण)
लॉकडाऊनचा पहिला टप्पा 14 एप्रिल 2020 रोजी संपला. त्याआधी अनेक एअरलाइन्सना आशा होती की 15 एप्रिलपासून निदान देशांतर्गत उड्डाणं सुरू होतील. मात्र आता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला असून तो 3 मेपर्यंत आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे उड्डाण होणार नसल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात विमान उद्योगाचे होणारे नुकसान अगणित आहे. परिणामी गोएअरने कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुट्टीवर धाडण्याचा कालावधी वाढवला आहे.
10 टक्के कर्मचारी करणार काम
गोएअरमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या 5500 कर्मचाऱ्यांंपैकी 10 टक्के कर्मचारीच कार्यरत राहणार आहे. हे ते कर्मचारी आहेत, ज्यांची सेवा अत्यावश्यक आहे. 4 मे पासून सर्व सेवा सुरू होतील अशी आशा गोएअरला आहे, जेणेकरून त्यांची बिघडलेली घडी बसली जाईल.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus