बेळगाव ते नाशिक एका तासात होणार प्रवास, पहिल्यावहिल्या विमानाने घेतलं उड्डाण

बेळगाव ते नाशिक एका तासात होणार प्रवास, पहिल्यावहिल्या विमानाने घेतलं उड्डाण

कर्नाटकातील बेळगाव ते महाराष्ट्रातील नाशिक (Belgaum-Nasik Flight) दरम्यान विमानसेवा सुरू झाली आहे. अवघ्या 60 मिनिटांत आता हा प्रवास पूर्ण करता येणार आहे

  • Share this:

नाशिक, 26 जानेवारी: आता बेळगाव ते नाशिक हा प्रवास अत्यंत सोपा होणार आहे. या दोन्ही शहरांना जोडणारी बहुप्रतीक्षित विमानसेवा (Belgaum-Nasik Direct Flight Service) सुरू झाली आहे. 25 जानेवारी 2021 रोजी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही विमानसेवा रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम 'उड़े देश का आम नागरिक' (UDAN) या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. आता बेळगाववरून नाशिकसह 10 ठिकाणांसाठी एअर कनेक्टिव्हिटी असणार आहे. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 311 मार्गांवर फ्लाइट सर्व्हिस दिली जात आहे. कर्नाटकमधील बेंगळुरू आणि मंगळुरूनंतर आता बेळगाव हे सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे. याआधी बेळगाव ते नाशिक दरम्यान एकही थेट फ्लाइट नव्हती.

आठवड्यातून तीनवेळा घेणार उड्डाण

बेळगाव ते नाशिक दरम्यान याआधी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील नव्हती. या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांना 10 तासांपेक्षा अधिक वेळ देऊन रस्तेमार्गाने प्रवास करावा लागत असे. स्टार एअरला या दोन्ही शहरांदरम्यान हवाई सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. विमानप्रवास भाडे स्वस्त आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारी विमानसेवा हा उद्देश ठेवून एअरलाइनला वायबिलिटी गॅप फंडिंग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(हे वाचा-डिजिटल मतदार ओळखपत्र कसं मिळवाल? वाचा तुमच्या मनातील 19 प्रश्नांची उत्तरे)

स्टार एअरचे 50 सीट्सचे ERJ-145 हे विमान आठवड्यातील तीन दिवस उड्डाण घेणार आहे. सोमवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी या विमानसेवेचा लाभ सामान्यांना घेता येणार आहे. बेळगावमधून फ्लाइट संध्याकाळी 4.40 वाजता उड्डाण घेईल ती नाशिकमध्ये 5.40 ला पोहोचेल. नाशिकमधून संध्याकाळी 6.15 ला विमान उड्डाण घेईल ते बेळगावमध्ये 7.15 ला पोहोचेल.

बेळगाव नाशिकला होणार हे फायदे

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून नाशिककडे पाहिलं जातं. देशात होणाऱ्या 4 कुंभमेळ्यापैकी एक नाशिकमध्येच होतो. शिवाय शिर्डी, त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी नाशिक हे शहर गेटवे आहे. लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी नाशिकमध्ये येतात. शिवाय नाशिकची ओळख भारताची द्राक्ष आणि वाइनची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे एका तासात बेळगावातून प्रवास होत असेल, तर निश्चितच लोकांची ये-जा वाढणार आहे. परिणामी नाशिकमधील व्यवसायाचा फायदा दोन्ही शहरांना होणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 26, 2021, 11:04 AM IST

ताज्या बातम्या