नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : वाढती महागाई आणि बाजारात सध्या सुरू असलेली अस्थिरता, मंदीमुळे लोक चिंतेत आहेत. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. आता एका डॉलरच्या तुलनेत आता रुपयाची किंमत ही 82.69 इतकी झाली आहे. तर अर्थतज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाची सततची कमजोरी आर्थिक विकास दर आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही. पण अमेरिका दौऱ्यात पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात वेगळेच उत्तर दिले. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जर तुम्ही जगातील इतर देशांच्या चलनावर नजर टाकली तर तुमचा रुपया त्याच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. ते ‘इमर्जिंग मार्केट करन्सी’बद्दल बोलल्या. याचा अर्थ जे देश विकासाकडे वाटचाल करत आहेत, त्यांचा रुपया त्या सर्व देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. अर्थमंत्र्यांनी काय दिले कारण? या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, डॉलर दिवसेंदिवस मजबूत होत असल्याने रुपयाची घसरण होत आहे. पण रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या घसरणीबाबत अशा वेळी हे वक्तव्य केले आहे, जेव्हा भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 82.69 वर पोहोचला आहे. ही आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे. RBI भारतीय चलनाला का सहकार्य करत नाहीए? भारतीय चलनाला आधार देण्यासाठी बाजारात रिझव्र्ह बँकेने कोणताही हस्तक्षेप न केल्याने अर्थमंत्री म्हणाल्या की, सध्या बाजारात कोणतीही मोठी अस्थिरता नाही याकडे रिझर्व्ह बँक अधिक लक्ष देत आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय रुपयाने इतर अनेक उदयोन्मुख बाजार देशांच्या चलनापेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. इतर सर्व चलने अमेरिकन डॉलरच्या विरोधत टिकली आहेत. अर्थमंत्री अमेरिका दौऱ्यावर - जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या वार्षिक बैठकीस उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारची बाजू घेतली. महागाईचे कारण : रशिया-युक्रेन युद्ध रुपयाच्या नुकत्याच झालेल्या घसरणीला जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये सर्वात ठळकपणे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाच्या व्यवसायावर होताना दिसत आहे. यामुळे जगभरातील वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम जगभर महागाईच्या रूपात दिसून येत आहे. हेही वाचा - दिवाळीपूर्वी सरकारची मोठी भेट, ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला या महागाईला आळा घालण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करत आहे. जगातील बाकीचे देश देखील याचे अनुसरण करत आहेत आणि यापूर्वीही असे झाले आहे. याचा थेट परिणाम डॉलर मजबूत होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.