नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: उद्यापासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होत आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकेसंबंधी तसंच काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट (update mobile number in bank account) करण्यासह इतर महत्त्वाची कामं तुम्ही केली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर आज 30 सप्टेंबरला तुम्हाला सर्वात प्रथम बँकेसंबंधी महत्त्वाची कामं करून घ्या. नाहीतर आगामी काळात तुम्हाला त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुमचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं.
1 ऑक्टोबरपासून बँकेसंबंधी काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे बँकेतील काही महत्त्वाची कामं ही 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.
1. ऑटो डेबिट पेमेंट प्रणालीत बदल
ऑटो डेबिट पेमेंट (auto debit payments) सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, एलआयसी किंवा इतर कोणतीही बिलं सेव्ह केली असतील तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. दरम्यान या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचा नंबर अपडेट झाला नसेल, तर आजच बँकेत जा. नवीन सिस्टीम अंतर्गत पेमेंट रक्कम ज्या दिवशी कापली जाणार आहे, त्या तारखेच्या 5 दिवस अगोदर बँकांना ग्राहकांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पाठवावं लागेल. नोटिकेशनला ग्राहकांची मान्यता असणं आवश्यक आहे. 5000 पेक्षा जास्त रक्कमेचे पेमेंट असल्यास ओटीपी (OTP) अनिवार्य करण्यात आलाय. त्यामुळेच नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत तुमचा योग्य मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक आहे.
6 महिन्याच्या निचांकी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, काय आहे आजचा सोन्याचा भाव
2. बदलणार या तीन बँकांचे चेकबुक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक यांचं जुनं चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होईल. त्यामुळे जर तुमच्याकडे या बँकांचं जुनं चेकबुक असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्यवहारात कोणत्याही समस्येला सामोरे जावं लागणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक सहज मिळवू शकता. अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्या आहेत.
3. डीमॅट खात्याबाबतचा हा नियम
शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) जारी केलेल्या नियमांनुसार नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खातं उघडण्यासंबंधी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार जर तुमच्याकडे डीमॅट खाते असेल, तर हे खाते 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी (KYC) अपडेट करावे लागेल. केवायसी अपडेट केले नाही, तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्हाला शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाहीत. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तरी हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण आणि पडताळणी केल्यानंतरच त्याने विकत घेतलेले शेअर्स त्याच्या डी मॅट खात्यात जमा केले जातील
सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर; खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि...
4. स्वस्तात लोन मिळवण्याची शेवटची संधी
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 30 सप्टेंबरपर्यंत गृहकर्जावर प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्ज न आकारण्याचा निर्णय घेतलाय. बँक 6.80 टक्के व्याज दराने गृहकर्ज देत आहे. तुम्ही पीएनबीकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज या ऑफरचा लाभ घेण्याची शेवटची संधी आहे.
5. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आजच करा रजिस्टर
अंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. जर तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळवायचे असतील तर 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही आज रजिस्टर केलं तर तुम्हाला याआधी जारी करण्यात आलेला नववा हप्ता आणि पुढे येणारा दहावा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार मिळतील. लवकरच दहावा हप्ता (PM KISAN 10th installment) जारी केला जाणार आहे.
6. आजच करा ई-नॉमिनेशन
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO latest News Update) आपल्या सदस्यांना ई-नॉमिनेशन (epfo e nomination) प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. ईपीएफ / ईपीएससाठी ई-नॉमिनेशन कसे भरता येईल, याची माहिती ईपीएफओ सातत्याने ट्विट करून देत आहे. ईपीएफओ सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. योजनेमध्ये नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. जर एखादा सदस्याचा मुत्यू झाला, आणि त्याने नॉमिनेशन अर्ज भरला नसेल, तर अशावेळी वारसदारांना पैसे देण्यात अडचणी येतात. त्यामुळे नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा लाखोंचे नुकसान होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank details, Money, बँक