मुंबई 22 ऑक्टोबर : प्रत्येक सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येत असतो. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीत येणारी भाऊबीजही भावंडांसाठी एक विशेष पर्वणी असते. भाऊ-बहिणीसाठी या दिवसाचं एक वेगळंच महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करते. भाऊ बहिणीला नाना तऱ्हेच्या भेटवस्तू देत असतो. बहिणीची आवड लक्षात घेऊन ती देण्याचा भाऊ नेहमीच प्रयत्न करतो. यंदाची भाऊबीज अविस्मरणीय करायची असेल तर बहिणीला सुरक्षित भविष्याची हमी देऊन हा सण साजरा करायला हवा. भारतात राखी पौर्णिमा आणि भाऊबीज या दोन सणांना भावांकडून काही तरी विशेष मिळेल म्हणून बहीण या दिवसाची प्रतीक्षा करत असते. या सणांना भाऊही बहिणीला तिच्या उपयोगाची वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. परंतु बहिणीला इतर कुठल्याही वस्तूपेक्षा सोनं किंवा शेअर्स भेट स्वरूपात देत असाल तर बहीण आनंदी होईलच आणि तिच्या सुरक्षित भविष्याची हमीही देता येऊ शकेल. बहिणीला भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी काही निवडक पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. Diwali 2022 : दिवाळीत मिळणाऱ्या बोनस आणि गिफ्टवर Tax लागतो का? सोनं देणं नेहमीच फायद्याचं सोनं खरेदी हा नेहमीच फायद्याचा व्यवहार असल्याचं म्हटलं जातं. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीही नफाच मिळवून देत असते. त्यामुळे बहिणीला सोन्याची भेटवस्तू देणं उत्तमच आहे. भारतात सोन्याचे दागिने भेट म्हणून देण्याची प्रथा आधीपासून सुरू आहे. त्यामुळे या भाऊबीजेला तुम्ही बहिणीला सोन्याचे दागिने भेट म्हणून देऊ शकता. यात सोन्याच्या नाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. सराफा बाजारात सोनं खरेदी करताना नेहमी दर्जाचा विचार करायला हवा. दागिन्यांची खरेदी करायची असेल तर 24 कॅरेट हॉलमार्क दागिनेच विकत घ्यायला हवेत. डिजिटल सोन्याचा पर्यायही उत्तम गुंतवणुकीच्या दृष्टीने डिजिटल सोनं हा उत्तम पर्याय आहे. यात दागिने किंवा सोन्याचं नाणं दिलं जात नाही; पण तुम्ही तुमच्या नावावर दिलेल्या रकमेनुसार डिजिटल सोनं फिक्स करून ठेवू शकता. विशेष म्हणजे गुंतवणुकीचा हा पर्याय निवडला तर सोनं हरवण्याचा धोका नाही व सोन्याची विक्री करताना घडणावळीच्या रूपात पैसे कमी येण्याची शक्यताही नसते. बहिणीच्या नावे डिजिटल सोन्यात गुंतवणूक करून भाऊबीजेला ते भेट म्हणून देऊ शकता. डिजिटल सोनं खरेदी करण्याची सर्वांत उत्तम पद्धत म्हणजे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड. याला ईटीएफ असंही नाव आहे. याशिवाय गोल्ड लिंक्ड म्हणजेच सोन्याशी संबंधित म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. अनेक ऑनलाइन पोर्टल्सच्या माध्यमातून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. तनिष्क, अॅक्सिस बँकेसह इतर बँकांमध्येही डिजिटल गोल्ड खरेदी करता येऊ शकतं. शेअर्सच्या रूपातली भेटही ठरू शकते विशेष बहिणीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही शेअर्सची खरेदी करून तिला ते शेअर्स देऊ शकता. शेअर बाजारातली गुंतवणूक धोक्याची मानली जाते; पण परतावाही चांगला मिळत असतो. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या दिवाळीत काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाउस असलेल्या आयडीबीआय कॅपिटलनं दिला आहे. त्यांच्या मते, हे शेअर्स एका वर्षात 34 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स, ब्लू डार्ट एक्स्पेस आणि ज्युबिलंट फूडवर्क्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, विविध ब्रोकरेज हाउसेसच्या सल्ल्यानुसार शेअर्सची नावं जाहीर केली जातात. वरीलपैकी कुठलेही शेअर्स घ्यायचे असतील तर आधी सर्टिफाइड इन्वेस्टमेंट अॅडव्हायझरचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.