नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Staff) महागाई भत्ता (Dearness allowance) अर्थात डीएमध्ये (DA) वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अनुमानानुसार, सरकार सध्या 34 टक्के असलेला डीए 38 टक्के करण्याची शक्यता आहे; मात्र याविषयीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाणार आहे. महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला गेल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात (Salary) वाढ होणार आहे. तसंच, डीआर वाढल्यास पेन्शनदेखील (Pension) वाढणार आहे. याचा हिशोब कसा असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे; पण डीएमध्ये वाढ होणार की नाही, याबाबत सरकारकडून ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकर डीए आणि डीआरबाबत निर्णय घेऊ शकतं अशी चर्चा आहे. एका वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत एक बैठक होण्याची शक्यता असून त्यात डीए आणि डीआर वाढीवर शिक्कामोर्तब केला जाईल. हे वाचा - PF मधील ठेवींवर व्याज कधी थांबते? अकाउंट क्लोज, टॅक्सचे नियम माहिती आहे का? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अर्थात डीए वाढल्यास त्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला 25,000 रुपये वेतन किंवा पेन्शन असेल, तर डीए किंवा डीआर 38 टक्क्यांनुसार 9500 रुपये होतो. सध्या 34 टक्के भत्ता मिळतो. त्यानुसार डीए किंवा डीआरची रक्कम 8500 रुपये होते. याचा अर्थ संबंधित कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतनात 1000 रुपयांनी वाढ होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन किंवा पेन्शन 35,000 रुपये असेल, तर 38 टक्क्यांच्या हिशोबानुसार 13,300 रुपये डीए किंवा डीआर होतो. सध्या 34 टक्क्यांनुसार ही रक्कम 11,900 रुपये आहे. याचा अर्थ दरमहा वेतनात 1400 रुपयांची वाढ होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन किंवा पेन्शन 45,000 रुपये असेल तर डीए किंवा डीआर 17,100 रुपये होईल. 34 टक्क्यांनुसार विचार केला, तर 15,300 रुपये वेतन सध्या मिळतं. चार टक्के डीए वाढल्यास वेतनात दरमहा 1800 रुपयांची वाढ होईल.
एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन किंवा पेन्शन 55,000 रुपये असेल तर 38 टक्क्यांच्या हिशोबानुसार डीए किंवा डीआर 20,900 रुपये होईल. सध्याच्या 34 टक्क्यानुसार त्यास 18,700 रुपये भत्ता मिळतो. याचा अर्थ डीए वाढल्यास वेतनात दरमहा 2200 रुपयांनी वाढ होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक वेतन 65,000 रुपये असेल, तर 38 टक्क्यांनुसार डीए 24,700 रुपये होतो. सध्याच्या 34 टक्क्यांनुसार हिशेब केला, तर त्याला 22,100 रुपये मिळतात. डीए 38 टक्के झाला, तर त्याच्या वेतनात 2600 रुपये वाढ होईल. हे वाचा - पेन्शनकरिता उघडता येईल ऑनलाइन एनपीएस अकाउंट; काय आहे प्रक्रिया? एका वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर वाढीबाबतची फाइल केंद्रीय कॅबिनेटच्या ऑफिसपर्यंत (Cabinet Office) पोहोचली आहे. त्यामुळे आता केवळ मंजुरीची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या तुलनेत किरकोळ महागाई वाढली असून, हा दर रिझर्व्ह बॅंकेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. हे पाहता डीए आणि डीआरमध्ये वाढ अपरिहार्य आहे. याचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. सरकार सामान्यतः डीए आणि डीआरशी (DR) संबंधित मान्यता स्वीकारते आणि वाढीस मान्यता देते. त्यामुळे महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.