नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : सेवानिवृत्तीनंतरच्या (Retirement) कालावधीत आर्थिक चणचण जाणवू नये, तसंच खर्चासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायला लागू नये यासाठी बहुतांश नोकरदार आधीपासूनच तरतूद सुरू करतात. शासकीय नोकरदार वर्गाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो; पण असा कोणताही लाभ खासगी नोकरदार वर्गाला मिळत नाही. त्यामुळे हा नोकरदार वर्ग सेवानिवृत्तीनंतर दरमहा ठराविक रक्कम मिळावी यासाठी बचतीवर भर देतो. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन (Pension) म्हणून दरमहा ठोस रक्कम हवी असेल, तर सरकारने सुरू केलेली नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस (NPS) या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत अकाउंट सुरू करून त्यात दरमहा बचत (Saving) करता येते. हे अकाउंट ऑनलाइन (Online) सुरू करता येते. त्यासाठी एक खास प्रक्रिया आहे. ती जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने त्याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Gmail स्टोरेज भरतच चाललंय? असं करा स्पॅम ई-मेल्सना फिल्टर, डिलीट आणि ब्लॉक नॅशनल पेन्शन स्कीमचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम `ई-एनपीएस` या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना निवडावी लागेल आणि रजिस्ट्रेशनमधल्या ‘इंडिव्हिज्युअल’ (Individual) या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तिथे पॅन नंबर, नाव, पत्ता, वय, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक भरावा लागेल. व्हेरिफिकेशनसाठी पॅन नंबरशी संलग्न मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) पाठवला जाईल. त्यानंतर तुमच्या पसंतीचा अकाउंट प्रकार निवडू शकता. ऑनलाइन एनपीएस अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही फक्त टियर 1 किंवा टियर 1, टियर 2 अशी दोन्ही अकाउंट्स उघडू शकता. सोलो टियर 2 अकाउंट सुरू करता येत नाही. यानंतर पेन्शन फंड मॅनेजर (Pension Fund Manager) निवडावा लागतो. एनपीएस अकाउंटमध्ये भरलेल्या पैशांचं आठ पेन्शन फंड हाउसद्वारे व्यवस्थापन केलं जातं. त्यापैकी ग्राहक पसंतीचा फंड मॅनेजर निवडू शकतात. अकाउंट उघडताना गुंतवणूक प्रकारही (Investment Mode) निवडावा लागतो. ऑटो मोड निवडला तर इक्विटी अॅलोकेशन (Equity Allocation) आपोआप होतं आणि वयानुसार त्यात गुंतवणूक सुरू होते. अॅक्टिव्ह मोडमध्ये ग्राहक आवडीनुसार इक्विटी, कॉर्पोरेट आणि डेट फंड निवडू शकतात. यात पैसे गुंतवले जातात. नॉमिनी अर्थात वारसदाराची नोंद करणं अनिवार्य असतं. वारसदार व्यक्तीचे तपशील भरावेत. ग्राहकाच्या मृत्यूनंतर या नॉमिनीला फंड दिला जातो. वेगवेगळ्या नॉमिनीच्या नावे (Nominee) फंडाचं विभाजन कसं करायचं आहे, हेदेखील ठरवता येतं. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतात. यात पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो आणि डिजिटल सिग्नेचरची स्कॅन कॉपीही अपलोड करावी लागेल. या कागदपत्रांच्या फोटोफाइलचा आकार 12kb पेक्षा जास्त नसावा आणि ते jpg फॉरमॅटमध्ये असावेत. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एनपीएस अकाउंटमध्ये प्रारंभिक रक्कम जमा करावी लागते. यासाठी इंटरनेट बॅंकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करू शकता. टियर 1 अकाउंटसाठी किमान 500 रुपये आणि टियर 2 अकाउंटसाठी 1हजार रुपये सुरुवातीला भरावे लागतात. पेमेंट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मची एक ऑटो कॉपी मिळते. हा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी. यानंतर तुमचा कायम निवृत्ती खाते क्रमांक अर्थात पीआरएएन (PRAN) तयार केला जाईल. हे पीआरएएन कार्ड, योजनेची कागदपत्रं तुमच्या नोंदणीकृत पत्यावर पाठवली जातील. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर डाउनलोड केलेल्या फॉर्मची प्रिंट अवश्य काढा. त्यावर तुमचा फोटो पेस्ट करा, आवश्यक कागदपत्रं त्याला जोडा आणि ई-एनपीएस अकाउंट सुरू केल्यानंतर 90 दिवसांच्या आत केंद्रीय रेकॉर्डकीपिंग एजन्सीला ते ई-मेल करा. असं केलं नाही तर तुमचं एनपीएस अकाउंट गोठवलं जाऊ शकतं. नॅशनल पेन्शन स्कीम हे एक सेवानिवृत्ती उत्पादन (Retirement Product) आहे. त्यात तुम्ही पेन्शनसाठी पैसे जमा करू शकता. ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना असून, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (PFRDA) कक्षेत येते. ही एक दीर्घकालीन बचत योजना असून, त्याच्या मदतीनं तुम्ही सेवानिवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी निधी उभारू शकता. ही योजना मार्केट लिंक्ड असून, त्यात तुम्ही वयाच्या 60व्या वर्षांपर्यंत तुमच्या इच्छेनुसार पैसे गुंतवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.