नवी दिल्ली, 07 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरातील विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. बँकिंग क्षेत्र देखील या नुकसानातून वाचले नाही आहे. त्याचमुळे खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरी पॅकेजमध्ये कपात केली आहे. कोटक महिंद्रा बँक मे 2020 पासून त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणार आहे ज्यांचा पगार प्रति वर्षासाठी 25 लाखापेक्षा जास्त आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्क्यांनी कपात होणार आहे. कर्मचाऱ्यांना मेल पाठवून बँकेने यासंदर्भात कळवले आहे. ज्यांच्या पगार वार्षिक 25 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही आहे. कोव्हिड-19 (COVID-19) मुळे बँकेच्या एकंदरित व्यवहाराला बसलेल्या फटक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (हे वाचा- रतन टाटांनी खरेदी केली मुंबईच्या 18 वर्षीय तरुणाच्या फार्मसीमध्ये 50% भागीदारी ) बँकेने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, COVID-19 मुळे आपली अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. आपल्यासारख्या वित्तिय सेवा देणाऱ्या कंपन्या यामुळे प्रभावित होणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्यवसाय वाचवण्यासाठी खर्च आणि इतर ऑपरेशन्सची पूर्तता करावी लागेल. आम्हाला याची खात्री करावी लागेल की, आमचे सहकारी सुरक्षित आहेत आणि त्यांची नोकरी सुरक्षित राहावी याकरता देखील आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहे. मनीकंट्रोल ने कोटक बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलची समीक्षा केली आहे. (हे वाचा- कोरोनामुळे ATMमधून पैसे काढायला भीती वाटतेय?आता शेजारच्या दुकानातूनही मिळेल रोकड ) कोरोना व्हायरस संक्रमणाच्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक यांनी चालू फिस्कल वर्षात केवळ 1 रुपया पगार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 15 टक्के कपात केली आहे. बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, ‘कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही काळ आपल्याबरोबर असणार आहे. सुरूवातीला केवळ 2-3 महिन्यापुरती असेल अशी वाटणारी महामारी आयुष्य आणि उपजीविका दोघांवरही परिणाम करत आहे. त्यात हे निश्चित आहे की हे संकट लवकर दूर होणाऱ्यातलं नाही आहे. संपूर्ण मानवजाती अशी अपेक्षा ठेवून आहे की, लवकरात लवकर व्हॅक्सिन आणि अँटिडोट मिळेल.’ संपादन- जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.