• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; टॉप 10 मधील 9 कंपन्यांना कोट्यावधींचा फटका

कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; टॉप 10 मधील 9 कंपन्यांना कोट्यावधींचा फटका

सेन्सेक्समधल्या (Sensex) 10 आघाडीच्या कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (Market Capitalization) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,33,433.64 कोटी रुपयांचं नुकसान झालं. आठवड्यात सर्वांत जास्त नुकसान हिंदुस्तान युनिलीव्हर कंपनीचं झालं.

  • Share this:
नवी दिल्ली 26 एप्रिल : कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) सध्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला तर धाप लागलीच आहे; पण अन्य सर्व क्षेत्रांवरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत आणि दिवसेंदिवस ते अधिक तीव्र होत आहेत. शेअर बाजारावरही (Share Market) विपरीत परिणाम दिसत असून त्यामध्ये घसरण होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हिंदुस्तान युनिलीव्हर (Hindustan Unilever) या कंपनीला एका आठवड्यात 34,918 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्यामुळे खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे; मात्र सॅनिटायझर, साबण आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे. तरीही आश्चर्याची गोष्ट अशी, की तेल, साबण आदी दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला शेअर बाजारात मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. 'टीव्ही नाईन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स (Sensex). सेन्सेक्समधल्या 10 आघाडीच्या कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (Market Capitalization) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,33,433.64 कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्या आठवड्यात सर्वांत जास्त नुकसान हिंदुस्तान युनिलीव्हर कंपनीचं झालं. त्या कंपनीचं मार्केट कॅप 34,918.58 कोटी रुपयांनी घटून, 5,42,292 कोटी रुपयांवर आलं. केवळ कन्झ्युमर गुड्स (Consumer Goods) कंपन्यांवरच कोरोनाची अवकृपा झाली आहे असं नव्हे. देशातली सर्वांत मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) मार्केट कॅपही या कालावधीत 30,887.07 कोटी रुपयांनी घटून 11,50,331 कोटी रुपयांवर आला आहे. भारती एअरटेल (Bharati Airtel) या टेलिकॉम क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीलाही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. या कालावधीत भारती एअरटेलचं मार्केट कॅप 10,270.09 कोटी रुपयांनी घसरून 2,86,601.44 कोटी रुपये झालं आहे. बँकिंग आणि फायनान्स (Banking & Finance) क्षेत्रालाही याची झळ पोहोचली आहे. एचडीएफसीचं (HDFC) मार्केट कॅप 13,755.09 कोटी रुपयांनी घसरून 4,50,499.54 कोटी रुपयांवर आलं. एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप 7899.58 कोटी रुपयांनी घसरून 7,79,671.98 कोटी रुपयांवर आलं. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ही देशातली सर्वांत मोठी कंपनी. या कंपनीला नुकसान सोसावं लागलं असून, त्या कंपनीचं मार्केट कॅप 18,764.75 कोटी रुपयांनी घसरून 12,07,283.32 कोटी रुपयांवर आलं. इन्फोसिस कंपनीही (Infosys) या घसरणीतून सुटली नाही. त्यांचं मार्केट कॅप 7967.43 कोटी रुपयांनी घसरून 5,68,308.25 कोटी रुपयांवर आलं. कोटक महिंद्रा बँकेचं भांडवली मूल्यही 5995.06 कोटी रुपयांनी घसरलं आणि 3,43,907.94 कोटी रुपयांवर आलं. स्टेट बँक ऑफ इंडियाचं भांडवली मूल्य 3078.99 कोटी रुपयांनी घसरून 3,00,268.56 कोटी रुपयांवर आलं. आयसीआयसीआय (ICICI) ही देशातली सर्वांत मोठी खासगी बँक. तिचं बाजारमूल्य मात्र 2412.18 कोटी रुपयांनी वाढून 3,94,315.01 कोटी रुपयांवर पोहोचलं.
Published by:Kiran Pharate
First published: