मुंबई, 25 जानेवारी- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आज अनेक क्षेत्रांमध्ये केला जातोय. शेतीतही त्याच्या साह्यानं नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. उत्पादन वाढवून चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत आहेत. त्यापैकी काहींची यशोगाथा होतकरूंसाठी आदर्शवत ठरते आहे. त्यापैकीच एक उदाहरण आहे तन्वीबेन पटेल आणि त्यांचे पती हिमांशू पटेल या दाम्पत्याचं. हे दाम्पत्य गुजरातमध्ये राहत असून त्यांनी ऑरगॅनिक शेती व मधमाशीपालनातून लाखो रुपये कमावले आहेत. 'खेतीट्रेंड डॉट इन'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
इच्छा असेल तर काहीही शक्य होतं, असं म्हणतात. गुजरातमधल्या तन्वीबेन पटेल आणि हिमांशू पटेल या दाम्पत्यानेही चांगली खासगी नोकरी सोडून शेती करायचा निर्णय घेतला. आज ते या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. तन्वी पटेल या बीएड करून शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या, तर हिमांशू मेकॅनिकल इंजिनीअर होऊन खासगी कंपनीत नोकरी करत होते. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता; मात्र ते दोघंही तो व्यवसाय करत नव्हते. केवळ उदरनिर्वाहापुरतंच शेतीतून उत्पन्न घेत होते.
(हे वाचा:पती-पत्नीचा नादचखुळा! नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय;काही दिवसांतच बनले कोट्याधीश )
सेंद्रिय उत्पादनांची वाढलेली मागणी पाहून त्यांना सेंद्रिय शेती करण्याची कल्पना सुचली. गुजरातमधल्या पाटन इथं त्यांनी थोड्या जागेत सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. त्यातून चांगलं उत्पादन मिळालं; मात्र नंतर पिकावर कीड पडू लागली. सेंद्रिय शेती असल्यानं ते रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत नव्हते. त्या वेळी त्यांना मधमाशीपालन केल्यास कीड पडत नाही, असं कळलं. त्यामुळे त्यांनी राजस्थानमधून मधमाश्यांच्या 10 पेट्या आणून शेतात ठेवला. याचा अपेक्षित परिणाम झाला आणि पिकांवर कीड पडली नाही. यातून त्यांना मधाचंही चांगलं उत्पादन मिळालं. मध उत्पादनाचा व्यवसायही करता येऊ शकतो, याची त्यांना कल्पना आली.
मधमाशीपालनातून सध्या ते दोघं वर्षाला 12 लाख रुपयांची कमाई करतात. त्यांच्याकडे सध्या मधमाश्यांच्या 300 पेट्या आहेत. त्यातून वर्षाला 9 टन मध मिळतो. मधमाशीपालनाचा हा व्यवसाय ते सेंद्रिय पद्धतीनेच करतात.मधमाशीपालनाच्या व्यवसायासाठी तन्वी पटेल यांनी अहमदाबादच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन इथं प्रशिक्षण घेतलंय. त्याचे चांगले परिणाम पाहून त्यांनी सुरुवातीला 4 लाख रुपयांच्या 100 पेट्या घेतले. त्यांनी ‘स्वध’ या नावानं त्यांचा ब्रँड विकसित केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यवसाय करतात. तसंच जवळपासच्या व्यापाऱ्यांना विकतात. प्रचंड मेहनत आणि निष्ठेनं काम केल्यामुळेच तन्वी आणि हिमांशू यांनी त्यांच्या व्यवसायात प्रगती केली आहे. अनेक तरुण व्यावसायिक व शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Start business