नवी दिल्ली, 29 जानेवारी: येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 ला संसदेत (Union Budget 2022) देशाचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) सादर करणार आहेत. त्या पूर्वीपासूनच अर्थसंकल्पाबाबतच्या बऱ्याच चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. शिवाय याबाबतची उत्सुकताही काही कमी नाही. अर्थसंकल्पात ‘इन्कम टॅक्स स्लॅब’ (income tax slab) मध्ये बदल होईल, अशी अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का वर्ष 1950 मध्ये किती रुपये इन्कम टॅक्स भरावा लागत होता? अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आणि अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ‘इन्कम टॅक्स स्लॅब’. हा अर्थसंकल्पासंबंधी असा विषय आहे, ज्यावर प्रत्येक सामान्य नागरिकासोबतच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची देखील नजर असते. यावेळी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला आयकर स्लॅबमध्ये बदलाची अपेक्षा आहे. सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न आयकर मुक्त आहे. तर, 2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5 टक्के, 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 7.5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 लाख ते 15 लाख दरम्यानच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर आकारला जातो. हे वाचा- PM Kisan: काही आठवड्यात येणार योजनेचा 11वा हप्ता, लगेच तपासा तुमचं स्टेटस गेल्या आठ वर्षांपासून न बदललेल्या इन्कम टॅक्स स्लॅबबाबत अर्थमंत्री नक्कीच विचार करतील, अशी आशा करदात्यांना आहे. टॅक्सबाबत कोणताही निश्चित नियम नाही. शासनाकडून वेळोवेळी यामध्ये बदल करण्यात येतो. स्वातंत्र्यापासून प्रत्येक सरकार टॅक्स घेत आहे, असेही म्हटले जाते. 1949-50 च्या अर्थसंकल्पात कसा होता इन्कम टॅक्स स्लॅब? स्वातंत्र्यानंतर, भारतात प्रथमच 1949-50 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सचे दर निश्चित करण्यात आले. यापूर्वी 10 हजारांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 4 पैसे टॅक्स भरावा लागत होता. नंतर हा कमी करून 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 3 पैसे करण्यात आला. तर, 10 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 1.9 आणे कर भरावा लागत होता. 1949-50 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स दर निश्चित केल्यानंतर 1,500 रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागत नव्हता. या अर्थसंकल्पात 1501 ते 5000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 4.69 टक्के, 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10.94 टक्के टॅक्स भरावा लागत होता. याशिवाय, 10,001 ते 15,000 रुपये कमाई करणाऱ्यांना 21.88 टक्के दराने इन्कम टॅक्स भरावा लागत होता. 15,001 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांसाठी आयकर स्लॅब 31.25 टक्के होता. त्यानंतर वर्षानुवर्षे इन्कम टॅक्सचे नियम बदलले गेले. सध्या आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत आहे. हे वाचा- शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण, मात्र ‘हे’ शेअर्स 58% पर्यंत वधारले येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल केला जाईल, अशी आशा नोकरदार वर्गाला आहे. आता टॅक्स स्लॅबबाबत सरकार कोणता निर्णय घेणार, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.