नवी दिल्ली, 05 डिसेंबर: हजारो कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी ठेवून फरार असणारा उद्योजक विजय मल्ल्याविरोधात (Vijay Mallya) अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिक कठोरपणे कारवाई करत आहे. मल्ल्याला ईडीने (Enforcement Directorate) आणखी एक धक्का दिला आहे. फ्रान्समधील (France) तपास यंत्रणांच्या मदतीने ईडीने त्याचा फ्रान्सस्थीत एक फ्लॅट जप्त केला आहे. कोट्यवधींच्या असणाऱ्या या फ्लॅटजप्तीनंतर मल्ल्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी ही कारवाई केली. ईडीने जप्त केलेली ही मालमत्ता 1.6 मिलियन यूरो अर्थात 14.34 कोटींची आहे. विजय मल्ल्याविरोधात कारवाई केल्यानंतर ईडीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबात माहिती दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की ईडीने फ्रान्स अथॉरिटीसोबत (France Authority) विजय मल्ल्याची 32 एव्हेन्यू फोच (FOCH), फ्रान्स याठिकाणची संपत्ती जप्त केली आहे. विजय मल्ल्याविरोधातील ही आणखी एक मोठी कारवाई आहे.
ED seizes asset worth 1.6 Million Euros through French authority located at 32 Avenue FOCH, France of Vijay Mallya under PMLA in a #BankFraudCase
अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की परदेशात किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेली आहे. यानंतर ईडीने फ्रेंच एजन्सीसमवेत फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी कारवाई केली.
आरोपी विजय मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या विशेष कोर्टाने विजय मल्ल्याला गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. विजय मल्ल्या 9,000 कोटींच्या बँक कर्जाच्या प्रकरणात आरोपी आहे. मार्च 2016 पासून तो यूकेमध्ये राहत आहेत. विजय मल्ल्या सध्या जामिनावर बाहेर आहे. एप्रिल 2017 मध्ये स्कॉटलंड यार्डने त्यांच्याविरूद्ध वॉरंट जारी केले होते.