नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : सध्या जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अन्नधान्य आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतावर मंदीचा परिणाम जाणवणार नाही, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; मात्र भारतात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या सर्व स्थितीचा परिणाम अन्य क्षेत्रांवरही दिसून येत आहे. स्व-मालकीचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बहुतांश जण होम लोन अर्थात गृह कर्जाचा पर्याय निवडतात.
सध्याच्या महागाईच्या काळात गेल्या सहा महिन्यांत होम लोनच्या व्याजदरांत वाढ होताना दिसत आहे. रिझर्व्ह बॅंकेने मागच्या चार बैठकांमध्ये व्याजदरांत वाढ केली आहे. येत्या काळात ही स्थिती बदलेल अशी शक्यता दिसत नाही. एकीकडे सर्वच बॅंकांनी होम लोनच्या व्याजदरांत वाढ केलेली असताना दुसरीकडे एका सरकारी बॅंकेने मात्र होम लोनच्या व्याजदरात कपात करून कर्जदारांना काहीसा दिलासा दिला आहे. बॅंक ऑफ बडोदाने होम लोनच्या व्याजदरांत कपात केल्याची घोषणा नुकतीच केली आहे. याशिवाय बॅंकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. `इंडिया टीव्ही डॉट कॉम`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
महागाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे सहा महिन्यांत होम लोनच्या व्याजदरांत सातत्याने वाढ झाली आहे. आरबीआयने चार वेळा व्याजदर वाढवले आहेत. डिसेंबर 2022मध्ये होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीतदेखील अशाच प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे. एकीकडे होम लोनसाठीचे व्याजदर वाढत असताना सरकारी क्षेत्रातल्या बॅंक ऑफ बडोदाने मात्र होम लोनच्या व्याजदरांत कपात केली आहे. तसंच बँकेने मर्यादित कालावधीसाठी प्रक्रिया शुल्कदेखील माफ करण्याची घोषणा केली आहे.
हफ्ता कमी करण्यासाठी लोन ट्रान्सफरचा पर्याय, अशी असते प्रक्रिया
गेल्या आर्थिक आढावा बैठकीत रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर रेपो रेट 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेने चार वेळा मिळून 1.9 टक्क्यांनी यात वाढ केली आहे. एप्रिलपर्यंत देशातला रेपो रेट चार टक्के होता. याचा परिणाम होम लोनच्या व्याज दरावर दिसून आला आहे.
बॅंक ऑफ बडोदाने आपला होम लोनचा व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे बॅंकेच्या होम लोनचा व्याजदर आता 8.25 टक्के झाला आहे. यासोबत अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्कही मर्यादित कालावधीसाठी माफ करण्यात आलं आहे.
कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan, तुमची बँक आहे का?
बॅंक ऑफ बडोदाचा होम लोनसाठीचा व्याजदर एसबीआय आणि एचडीएफसी या महत्त्वाच्या बॅंकांच्या तुलनेत कमी आहे. या बॅंकांचा नवा दर 8.40 टक्के आहे. ``होम लोनचे नवे व्याजदर पुढील सोमवारपासून लागू होतील आणि डिसेंबर 2022 अखेरीपर्यंत हे दर लागू राहतील,`` असं बॅंक ऑफ बडोदातर्फे सांगण्यात आलं.
`आमचे होम लोनचे व्याजदर आता सर्वांत कमी आणि सर्वांत स्पर्धात्मक दरांपैकी आहेत. आम्ही व्याजदरात 0.25 टक्के सूट देत आहोत आणि प्रक्रिया शुल्कदेखील पूर्णपणे माफ करत आहोत,` अशी माहिती बॅंक ऑफ बडोदाचे सरव्यवस्थापक (गहाण आणि किरकोळ मालमत्ता व्यवसाय) एच. टी. सोळंकी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.