मुंबई, 9 नोव्हेंबर : आपण कार, घर खरेदी किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेतो. आपला उद्देश पूर्ण होण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी कर्जाच्या माध्यमातून मिळवला जातो. कर्जाचं सर्व गणित कालावधी आणि व्याजदरावर अवलंबून असतं. जास्त व्याजदराने कर्ज घेतलं गेलं, तर त्यामुळे आर्थिक भार वाढतो. अशा वेळी कमी व्याजदर असलेल्या वित्तीय संस्थेत किंवा बॅंकेत उर्वरित कर्ज ट्रान्स्फर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. व्याजदर कमी झाल्याने आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. परंतु, कोणत्याही प्रकारचं कर्ज ट्रान्स्फर कसं करायचं याविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. कर्ज ट्रान्स्फर करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेविषयी जाणून घेऊ या. तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज एखादी वित्तीय संस्था किंवा बॅंकेकडून घेतलं असेल आणि तुम्हाला त्यांच्या अटी, व्याजदर जाचक वाटत असतील तर तुम्ही कर्ज ट्रान्स्फर करण्याबाबत विचार करू शकता; मात्र कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी थोडी पूर्वतयारी करावी लागते. कोणत्याही स्वरूपाचं कर्ज ट्रान्स्फर करण्यापूर्वी इतर बॅंका किंवा वित्तीय संस्थांचे नियम, अटी आणि व्याजदराविषयी माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कर्ज घेतलेल्या बॅंकेचा व्याजदर आणि अन्य बॅंकांचे दर यांचा तुलना अभ्यास केला पाहिजे. तसंच ईएमआय कॅल्क्युलेट केला पाहिजे. यावरून तुम्हाला आर्थिक बाबींचा अंदाज येईल. त्याचप्रमाणे तुम्ही कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी पात्र आहात का याचीदेखील पडताळणी केली पाहिजे. कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठीच्या पात्रतेचे काही निकष ठरलेले असतात. या पात्रता निकषांची माहिती घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कर्ज ट्रान्स्फरसाठी करण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक असतात. अशा कागदपत्रांची जमवाजमव केली पाहिजे. त्याचप्रमाणे सध्या तुम्ही ज्या बँकेचं कर्ज घेतलं आहे, त्या बॅंकेलाही या संदर्भात पूर्वसूचना दिली पाहिजे. कोणत्याही स्वरूपाचं कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी प्रक्रिया असते. ज्या बॅंकेकडे कर्ज ट्रान्स्फर करायचं आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जावं. त्यानंतर सर्व नियम, अटी, निकष, व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती घ्यावी. त्यानंतर बॅलन्स ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज करावा. त्या अर्जात तुमचं नाव, ज्यासाठी कर्ज घेतलं आहे त्याचा तपशील, चालू असलेल्या लोनचा कालावधी, बॅंकेचं नाव आदी माहिती भरावी. त्यानंतर ज्या बॅंकेत लोन ट्रान्स्फर करायचं आहे तिथल्या कर्ज योजनांच्या निकषात आपण बसतोय का हे पाहावं. थकित कर्जाच्या रकमेसह विद्यमान बॅंकेकडून संमतिपत्र घ्यावं. या गोष्टी पूर्ण केल्यानंतर आवश्यक शुल्क भरून कागदपत्रं अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी. दरम्यान नवीन बॅंक तुमच्या जुन्या बॅंकेकडे सर्व शिल्लक रक्कम भरेल. त्यानंतर तुमचं जुनं कर्ज खातं बंद होईल आणि कर्जाची सर्व नवीन देयकं नवीन बॅंकेकडे भरावी लागतील. त्यानंतर जुन्या बॅंकेकडे असलेली तुमची कर्जाशी निगडित कागदपत्रं नवीन बॅंकेकडे सुपूर्द करावीत. अशा पद्धतीनं तुमची कर्ज ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







