नवी दिल्ली, 17 मार्च : मोठ्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमिवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी एखादं पेमेंट करताना जास्तीत जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा. कोरोना व्हायरस पसरणं थांबवण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धती वापरणं आवश्यक असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
(हे वाचा- कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा..)
तरीही तुमचं बँकेत जाऊन करावं लागणारं कोणतही काम बाकी असेल तर ते पुढच्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पूर्ण करून घ्या. कारण पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. पीएसयू बँकाचा (PSU Banks) असणारा बँकांच्या मेगा विलिनीकरणाला विरोध, पगारवाढ आणि आठवड्यातून 2 दिवस सुट्टी या विविध मागण्यांसाठी बँक युनियनकडून 27 मार्चला संप करण्यात येणार आहे.
(हे वाचा- खुशखबर! सोन्याच्या दरात 2000 रुपयांची विक्रमी घसरण, असे आहेत आजचे दर)
याआधी हा संप 11 मार्चला होणार होता. बँक युनियननी असा इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 1 एप्रिलपासून त्यांच्याकडून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल.
काय आहेत मागण्या?
त्यांच्या मागण्यांमध्ये 10 पीएसयू बँकांचे प्रस्तावित विलीनीकरण थांबवणे, आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण, बँकिंग सुधारणांचे रोलबॅक, बेड कर्जाची वसुली आणि ठेवींवरील व्याज दरात वाढ मुख्यत: या गोष्टींचा समावेश आहे.
4 दिवस बँका राहणार बंद
जर हा संप झाला तर या महिन्याच्या शेवटी 4 दिवस बँका बंद राहतील. 25 मार्चला गुढीपाडवा असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद आहेत. 27 मार्चला संप, 28 मार्च चौथा शनिवार तर 29 मार्च रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे एकूण 4 दिवस बँका बंद आहेत.
यावर्षात याआधी 2 वेळा झाला आहे बँकांचा संप
बँक युनियन्सनी इशारा दिल्याप्रमाणे 27 मार्च रोजी जर संप पुकारण्यात आला, तर 2020 सुरू झाल्यानंतरचा हा तिसरा संप असेल. याआधी 8 जानेवारीला भारत बंद दरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी मोदी सरकारच्या योजनांविरुद्ध एकदिवसीय संप केला होता. त्यानंतर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजीही बँक कर्मचारी संघटनांकडून संप करण्यात आला होता.