मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग, इतके मोजावे लागणार पैसे

ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग, इतके मोजावे लागणार पैसे

ATM Cash withdrawal: मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्तीच्या व्यवहारांवरचं शुल्क वाढवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जूनमध्ये बँकांना दिली होती.

ATM Cash withdrawal: मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्तीच्या व्यवहारांवरचं शुल्क वाढवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जूनमध्ये बँकांना दिली होती.

ATM Cash withdrawal: मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्तीच्या व्यवहारांवरचं शुल्क वाढवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जूनमध्ये बँकांना दिली होती.

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : रोख रकमेचा (Cash) वापर करून आर्थिक व्यवहार करण्याचं प्रमाण कमी झालं असलं, तरी अजूनही रोख रक्कम देऊनच व्यवहार करण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत जाणाऱ्या किंवा एटीएमला (ATM) भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातही सरकारी बँका, खासगी मोठ्या बँका एटीएमद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देत असल्यानं, मोठ्या प्रमाणात नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएमचा (ATM) वापर करतात. पण आता एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.

एटीएमची ही सेवा बँका मोफत देतात; मात्र ही सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी एटीएम केंद्र उभारण्याचा खर्च, सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा यांचा खर्च याचा भार बँकांनाच सोसावा लागतो. त्यामुळे बँकांनी या सेवेसाठी काही शुल्क आकारण्याची परवानगी देण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली होती. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने काही ठरावीक वेळा हे व्यवहार नि:शुल्क दिल्यानंतर त्यानंतरच्या व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याची परवानगी दिली होती. आता या मोफत व्यवहारांची (Free Cash Withdrawals) मर्यादा संपल्यानंतरच्या व्यवहारांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे.

आता ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेच्या पुढच्या व्यवहारांसाठी अधिक शुल्क द्यावं लागणार आहे. त्यामुळे महिन्यात अनेक वेळा एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अधिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून हे वाढीव शुल्क लागू होणार असल्याचं 'मिंट'च्या वृत्तात म्हटलं आहे. 2022पासून ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी प्रति व्यवहार 21 रुपये शुल्क द्यावं लागेल, असं 'मिंट'च्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाचा : स्मॉल फायनान्स बँकांमध्ये FD वर 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज, पाहा लिस्ट

रोख आणि नॉन-कॅश एटीएम (Non cash ATM) व्यवहारांसाठी 1 जानेवारी 2022 पासून मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्तीच्या व्यवहारांवरचं शुल्क वाढवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जूनमध्ये बँकांना दिली होती. 'रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वरील आर्थिक व्यवहार शुल्क 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. अॅक्सिस बँक किंवा इतर बँक एटीएममध्ये मोफत मर्यादेपलीकडच्या प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये अधिक जीएसटी असं शुल्क लागू होईल,' असं अॅक्सिस बँकेनं (Axis Bank) एका निवेदनात म्हटलं आहे. बँकांना जास्त इंटरचेंज फीची (Interchange Fee) भरपाई करण्यासाठी आणि खर्चातली वाढ लक्षात घेता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार 21 रुपये आकारण्याची परवानगी आहे. ही वाढ एक जानेवारी 2022 पासून लागू होईल, असं रिझर्व्ह बँकेनं एका परिपत्रकात म्हटलं आहे.

वाचा : पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

तथापि, ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतील. मेट्रो शहरांमधल्या (Metro centers) इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना आर्थिक व्यवहारांकरिता प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि सर्व केंद्रांमधल्या बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्याची परवानगी दिली होती. हे दर 1 ऑगस्ट, 2021 पासून लागू झाले होते. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात डिजिटल व्यवहारांचं वाढलेलं प्रमाण, एटीएमचा वाढलेला वापर, बँकांच्या खर्चात झालेली वाढ या सगळ्या पार्श्वभूमीवर बँकांनी एटीएम वापर शुल्क वाढवण्याची मागणी केली होती. ती रिझर्व्ह बँकेने मान्य केली असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच हे नवीन दर लागू होतील.

First published:

Tags: ATM, Money