Home /News /money /

'Govt Yojana' चा कोणता SMS तुम्हालाही आला आहे का? तर वेळीच व्हा सावधान!

'Govt Yojana' चा कोणता SMS तुम्हालाही आला आहे का? तर वेळीच व्हा सावधान!

तुम्हाला 'Govt Yojana' अशा नावाने काही मेसेज आला आहे का? मग सावध व्हा. कारण या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकू शकता. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल (Viral Fake Message) झाला आहे.

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: तुम्हाला 'Govt Yojana' अशा नावाने काही मेसेज आला आहे का? मग सावध व्हा. कारण या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकू शकता. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल (Viral Fake Message) झाला आहे. त्यात असा दावा केला जात आहे, की सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये 2.67 लाख रुपये जमा झाले आहेत. ऑनलाइन माध्यमातून (Online Fraud) फसवणूक करणाऱ्या व्यक्ती सातत्याने याच विचारात असतात, की स्मार्टफोन युझर्सना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं. त्यासाठी ते दररोज नवनव्या पद्धती शोधून काढत असतात. सध्या व्हायरल झालेला मेसेजदेखील अशाच प्रकारचा फसवणुकीचा मेसेज असून, प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात 'पीआयबी'ने फॅक्ट चेकद्वारे याबद्दलचा इशारा दिला आहे. सध्या व्हायरल झालेल्या मेसेजमधला (Viral Message) मजकूर अशा आशयाचा आहे - 'सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात 2.67 लाख रुपये जमा झाले आहेत. तुम्हाला ते पैसे हवे असतील, तर लगेचच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावं.' या मेसेजच्या शेवटी एक लिंक देण्यात आली आहे. हे वाचा-Alert! 1 सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, RBI चा नवा नियम लागू करणार बँक केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (Press Information Bureau) जेव्हा या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा असं लक्षात आलं, की हा मेसेज खोटा आहे. अशा प्रकारची कोणतीही सरकारी योजना अस्तित्वात नाही. तसंच, सरकारने असा कोणताही मेसेज पाठवलेला नाही. त्यानंतर पीआयबीने ट्वीट (PIB Factcheck) करून त्याबद्दलची माहिती दिली. त्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, की 2,67,000 रुपये खात्यात जमा होणारी कोणतीही सरकारी योजना सुरू नाही. असा मेसेज तुम्हाला आला असेल, तर सावधानता बाळगावी. त्यातल्या लिंकवर क्लिक करू नये. तसंच हा मेसेज फॉरवर्डही करू नये. हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. पीआयबीने नागरिकांना असंही आवाहन केलं आहे, की केवळ याच नव्हे तर अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजद्वारे आलेल्या माहितीतून योजनेकरिता अर्ज करताना पडताळणी करून घ्यावी. केंद्र सरकारकडून सुरू केल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेही माहिती सुरुवातीला संबंधित मंत्रालयाकडूनच प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे संबंधित मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट तपासून पाहावी. तसंच, पीआयबी किंवा अन्य विश्वासार्ह माध्यमांमध्ये पडताळणी करावी आणि खात्री पटली, तरच अशा योजनांसाठी अर्ज करावा. अन्यथा अशा खोट्या मेसेजमुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे वाचा-सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी तुम्हालाही असा कोणताही संशयास्पद मेसेज आला असेल, तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी तो पीआयबीकडे पाठवता येतो. https://factcheck.pib.gov.in या वेबसाइटवर जाऊन तो मेसेज अपलोड करावा. 918799711259 या व्हॉट्सअॅप नंबरला किंवा pibfactcheck@gmail.com या ई-मेल आयडीवरही अशा मेसेजबद्दलची माहिती पाठवू शकता. तिथून तुम्हाला तो मेसेज खरा आहे की खोटा, हे कळवलं जाईल. पीआयबीकडे आलेल्या अशा सर्व संशयास्पद मेसेजेसची माहिती https://pib.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते. त्या माहितीचा उपयोग सर्वांना होऊ शकतो.
    First published:

    Tags: Money, PIB

    पुढील बातम्या