मराठी बातम्या /बातम्या /मनी /

छोट्या शहरांपर्यंतचा विमान प्रवास महागणार, या तारखेपासून सरकारचा शुल्कवाढीचा निर्णय

छोट्या शहरांपर्यंतचा विमान प्रवास महागणार, या तारखेपासून सरकारचा शुल्कवाढीचा निर्णय

देशांतर्गत विमान प्रवास महाग

देशांतर्गत विमान प्रवास महाग

सरकार प्रमुख मार्गांवर उड्डाण सेवा चालवणाऱ्या एअरलाइन्सकडून आकारलं जाणारं प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी शुल्क प्रतिफ्लाइट 10,000 रुपयांनी वाढवणार आहे. त्यामुळे साहजिकचा त्याचा तिकीट दरांवर परिणाम दिसेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : देशांतर्गत हवाई प्रवास येत्या काळात महागणार आहे. देशातील काही छोट्या शहरांसाठी असलेल्या विमानांच्या भाड्यात वाढ होणार आहे. सरकारने प्रादेशिक फ्लाइट्सवरील कनेक्टिव्हिटी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रति फ्लाइट आकारण्यात येणार आहे, त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. येत्या काळात तुम्ही देशांतर्गत प्रवास करणार असाल, तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. तुमचं तिकीट किती महागणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

सरकार प्रादेशिक हवाई संपर्क शुल्क वाढवणार

सरकार प्रमुख मार्गांवर उड्डाण सेवा चालवणाऱ्या एअरलाइन्सकडून आकारलं जाणारं प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी शुल्क प्रतिफ्लाइट 10,000 रुपयांनी वाढवणार आहे. हे सुधारित शुक्ल 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे जानेवारीपासून विमान प्रवास महागणार आहे. एका अधिसूचनेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सध्या हे शुल्क प्रति फ्लाइट 5,000 रुपये असून ते पुढील वर्षी 1 एप्रिलपर्यंत 15,000 रुपये होईल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत डिसेंबर 2016 पासून हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. या वर्षी 1 नोव्हेंबरपर्यंत, 451 उडान मार्गांवर उड्डाणं होत होती. येत्या काही वर्षांत अशा आणखी मार्गांवर सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. शुल्क वाढ लागू झाल्यानंतर विमान प्रवासाचे दर प्रतिव्यक्ती 50 रुपयांनी वाढतील, असं विमान उद्योगातील एका अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे या शुल्कवाढीचा बोजा सुरुवातीला जास्त नसणार आहे.

गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत केंद्र सरकारने शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क 1 जानेवारी ते 31 मार्च 2023 पर्यंत प्रतिफ्लाइट 10,000 रुपये, 1 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत प्रतिफ्लाइट 15,000 रुपये होईल, असं सांगण्यात आलंय.

काय आहे उडान योजना ?

भारत सरकारची उडान योजना ही देशातील दुर्गम भागात हवाई संपर्क तयार करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या शहरांमध्ये विमानतळाची सुविधा आहे, पण नियमित उड्डाणं होत नाहीत, अशा शहरांना छोट्या विमानांच्या मदतीने मुख्य विमानतळाशी जोडण्यात आलंय. या योजनेच्या मदतीने सर्वांत आधी ईशान्येकडील राज्यं जोडली गेली. या भागात रस्त्यांची सोय आहे, पण प्रवासाला खूप वेळ लागतो. या योजनेअंतर्गत प्रवाशांसोबतच दुर्गम भागात कार्गो म्हणजे सामानही पोहोचवलं जातं.

First published:

Tags: Airplane, Domestic flight, Travel by flight