सुदर्शन कानवडे, प्रतिनिधी अहमदनगर, 24 जून: महाराष्ट्रातील एका छोट्याश्या आदिवासी वस्तीतील सर्वसाधारण महिला ते पद्मश्री पुरस्कारापर्यंतची वाटचाल असा थक्क कराणारा प्रवास राहीबाई पोपरे यांचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या खेड्यातून त्यांनी सीड बँक सुरू केली. या बँकेत आतापर्यंत 250 हून अधिक देशी वाणांच्या बियांचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे. याच क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना बीजमाता म्हणून ओळख मिळाली. तसेच देशातील चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने राहीबाईंना गौरवण्यात आले. इथंपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अन्नधान्याचे संकरित वाण आजारांचे मूळ राहीबाईंनी गावामध्ये आजारी लोकांचं प्रमाण पाहिलं व निरीक्षण केलं. आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. परंतु आताच्या बाळांचा जन्म होतो तेव्हाच त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला. संकरित वाणांमुळे तर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी तर होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ बांधली. त्यांच्या मते आज कालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतांचा वापर करून घेतली जातात. परंतु देशी बियाणे मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येतात. त्यामुळे ते नैसर्गिक असल्याचं राहीबाई सांगतात.
बचत गटाच्या माध्यमातून काम राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाहीत. राहीबाईंनी ज्या गावठी बियाण्याचे संवर्धन केले आहे ते मूळ स्वरूपात आहे व त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते. राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी सोबत घेऊन बचत गट बनवला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. पारंपरिक पद्धतीनं जतन केल्या बिया पद्मश्री राहीबाई यांची सीड बँक जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्या उत्साहाने सगळ्या बियाण्यांबद्दल आपुलकीने माहिती देतात. आपण ज्या भाज्या बद्दल कधीही ऐकलं नाही. त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपारिक पद्धतीने जतन करून ठेवले आहे. त्यांच्या मते आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहील असा त्यांचा आत्मविश्वास आहे. कुणी केस कापतंय तर कुणी चपला शिवतंय; वारकऱ्यांच्या सेवेत भेटतोय विठ्ठल सीड बँकेत 250 हून अधिक वाण राहीबाईंच्या सीड बँक मध्ये आज अनेक पिकांचे 250 पेक्षा अधिक वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला होता. पुढे त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांमध्ये राहीबाई यांचा समावेश केलेला आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. शाश्वत शेतीला वरदान बीएआयएफ संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात सीडबँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. याचा परिणाम म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यासह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. यामुळे रासायनिक शेती कमी होऊन नैसर्गिक व गावरान पीक घेतलं जातंय . ज्यामुळे आजार कमी होण्यास मदत होणार आहे, असं राहीबाईंनी सांगितलं.