अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 24 जून : पंढरपूरची वारी ही समतेचा, बंधूभावाचा संदेश देणारा अनोखा सोहळा आहे. संतांच्या शिकवणुकीनुसार दरवर्षी आषाढी वारीला पंढरीत हा सोहळा होत असतो. लाखो भाविक दिंड्यांमधून पंढरीत येत असतात. जात, धर्म, पंथ, लिंग भेद विसरून सर्व सानथोर या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेकांना वारकऱ्यांच्या सेवेत विठ्ठल भेटतो. कुणी केस कापून, कुणी इस्त्री करून देऊन, कुणी चपला शिवून तर कुणी अन्नदान करून वारकऱ्यांची सेवा करत असतात. सोलापुरात वारकऱ्यांची सेवा यंदाच्या आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालखी सोलापुरात दाखल झाल्या आहेत.महाराष्ट्रातील सर्वात लांबचा प्रवास करणारी पालखी म्हणून शेगावच्या गजानन महाराजांची पालखी ओळखली जाते. ही पालखीही सोलापुरात पोहोचली आहे. सोलापुरातील सर्व जाती-धर्माचे बांधव एकत्र येत या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. या सेवेतच त्यांना विठ्ठल भेटत असल्याचे ते सांगतात.
कुणी केस कापतंय तर कुणी.. गजानन महाराजांची पालखी दरवर्षी उपलब्ध मंगल कार्यलयात मुक्कामासाठी येते. याठिकाणी सोलापुरातील नाभिक, चर्मकार आणि परीट समाजबांधव अनोखी सेवा देतात. नाभिक समाजाचे बांधव वारकऱ्यांचे मोफत केस कापणे, मालिश करण्याचे काम करतात. तर परीट समाज बांधव पांढरी कपडे, टोपीला इस्त्री करतात. चर्मकार समाजातील बांधव वारकऱ्यांच्या चपला शिवून, बुटांना पॉलिश करून देतात. सेवेत आम्हाला विठ्ठल भेटतो विशिष्ट जात वर्गाच्या कामांमधून नेमणूक झालेली ही जातव्यवस्थेतील माणसे आपला माणुसकी एकच धर्म म्हणत ही सेवा मोठ्या भक्ती भावाने पार पाडतात. शिवाय वारकऱ्यांची मालिश करणे आणि तेलाने त्यांचे पाय चेपणे हे सुद्धा हे भाविक करीत असतात. खऱ्या अर्थाने चांगल्या कर्मात देव आहे असे म्हणल्याप्रमाणे प्रत्येक जण चांगले कर्म करीत आपली सेवा बजावतात. त्याचप्रमाणे सेवेत आम्हाला विठ्ठल दिसतो त्यामुळे आम्हाला त्याचे पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावे लागत नाही, अशी देखील भावना या तिन्ही समाजातील समाज बांधवांनी व्यक्त केली. Ashadhi Wari 2023: विशेष विद्यार्थ्यांची निसर्ग वारी, केळीच्या पानांपासून साकारला विठ्ठल वारीत जाती-धर्म भेदाला थारा नाही जाती धर्म आणि पंथ या सर्व गोष्टी स्वतः मानवाने निर्माण केल्या आहेत. परंतु वारीत कोणती जात आणि कोणता धर्म यांना अजिबात धारा नाही. फक्त विठुरायाची सांप्रदायिक भक्ती करीत समाधान शोधत हे सेवेकरी आपली सेवा बजावत आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सेवेकऱ्यांमधील गोपाल नळीकोटू या नाभिक बांधवांच्या घरातील व्यक्ती नुकतीच मयत झाली असताना सुद्धा त्याने आपली सेवा बजावली आहे. यातूनच यांची सेवेप्रती असणारी निष्ठा जाणवते.