रत्नागिरी, 20 ऑगस्ट : महाराष्ट्रात रस्त्यांची सर्वदूर दुरावस्था झाली आहे. हे रस्ते सर्वसामान्यांच्या प्रचंड जीवावर बेतत आहेत. मुंबईच्या दहीसर भागातील दोन नागरिकांचा खड्ड्यांमुळे जीव गेल्याची बातमी ताजी असताना आज रत्नागिरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. खड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये रस्त्यावरच्या खड्याने एकाचा बळी घेतला आहे. खड्डा चुकवताना दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा तोल गेला. त्याचवेळी बाजूने भलामोठा मालवाहू ट्रक जात होता. या मालवाहू ट्रकच्या नेमक्या चाकात तरुण पडला. त्यामुळे तरुण जागेवरच चिरडला गेला. अतिशय धक्कादायक ही सगळी घटना होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिक प्रचंड आक्रमक झाले.
(मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर, लाखोंचा पगार; लव्ह मॅरेजच्या 4 वर्षांनंतर तरुणीने संपवलं जीवन!)
संबंधित घटना ही चिपळूणमधील पावर हाऊस येथे घडली. घटनेनंतर परिसरात बघ्यांची प्रचंड मोठी गर्दी केली. काही नागरिक यावेळी ट्रक चालकावर आक्रमक झाले. काही नागरिक तर इतके आक्रमक झाले की त्यांनी थेट रास्ता रोको केला. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
चिपळूणच्या पावर हाऊस जवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम एक रोड रोलर आणि जेसीबीच्या माध्यमातून सुरू होतं. मात्र या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सुपरवायझर नसल्याने या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत होती. या रस्त्यावरचा खड्डा चुकवताना अचानक बाईक स्लिप झाली आणि हा तरुण ट्रकच्या चाकाखाली आला. किरण कृष्णा घाणेकर असं अपघात झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कोडंमळा इथला रहिवासी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईतही अशीच एक घटना समोर आली होती. बाईकचालक मुंबईहून दहीसरच्या दिशेला निघाले होते. या दरम्यान नॅशनल पार्क हायवे ब्रिजवर एक मोठा खड्डा आल्याने बाईकचालकाने ब्रेक मारला. पण त्यांच्या पाठिमागे एक भरधाव डंपर येत होता. या भरधाव डंपरने बाईकला जोरात धडक दिली. त्यामुळे बाईकचालक आणि त्याच्यासोबत असलेली महिला रस्त्यावर पडले. त्यानंतरही त्यांच्यावरील संकट कमी झालेलं नव्हतं. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्याने डंपर चालकाने भरधाव डंपर त्या दोघांवर चालवून नेला आणि त्यांना चिरडलं. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कस्तुरबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील डंपरचा MH 02 ER 5461 असा नंबर आहे. तर अपघातग्रस्त दुचाकीचा Mh 04 HL 6804 असा नंबर आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. डंपरचालकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही प्रत्यक्षदर्शींनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chiplun