मुंबई,8 मार्च:येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ती म्हणजे राणा कपूर यांच्या कुटुंबाविरोधात लूकआऊट नोटिस बजावण्यात आली आहे. एवढेच नाही तर राणा कपूर यांच्या मुलगी रोशनी कपूर हिला मुंबई एअरपोर्टवर अडवण्यात आलं आहे. रोशनी कपूर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनला जात होती. अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने शुक्रवारी राणा कपूर यांच्या मुंबई येथील निवासस्ठानी छापेमारी केली होती. राणा यांची सलग 20 तास चौकशी करण्यात आली. नंतर राणा कपूर यांनी 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
#YesBank founder Rana Kapoor's daughter Roshni Kapoor stopped from leaving the country at Mumbai Airport. She was going to London by British Airways. pic.twitter.com/kLu6DYAn2j
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात राणा कपूरच्या मुलगी राखी कपूर-टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर यांचं नावही समोर आलं आहे. या तिघींचीही चौकशी करण्यात येणार आहे. येस बँकेच्या व्यवहारात अनियमितता दिसून आल्याने भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक निर्बंध लादले आहे. राणा कपूर, पत्नी आणि तिन्ही मुलींविरुद्ध लुकआउट नोटिस बजावली आहे. यामुळे मुलगी रोशनी कपूर हिला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे.
दुसरीकडे, रविवारी सायंकाळी CBI ने राणा कपूर आणि DHFL चे प्रोमोटर कपिल वाधवानी यांच्याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींना दिवान हाउसिंग फायनान्स कॉरपोरेशन (DHFL)ला एप्रिल ते जुलै 2018 मध्ये दिलेल्या 600 कोटींच्या कर्ज प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले. आरोप असा आहे की, DHFL ने हे कर्ज डॉयट अर्बन व्हेंचर्सला दिलं, ज्याचा मालकी हक्क राणा कपूरच्या कुटुंबीयांकडे आहे.
राणा कपूरच्या मुली राधा आणि रोशनी डॉयट अर्बन व्हेंचर्सच्या संचालक आहेत. येस बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात डीएचएफएलला अपयश आलं, तेव्हा डॉयल अर्बन व्हेंचरला 600 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय ईडी इतर पाच हजार कोटींच्या अन्य व्यवहारांचीही चौकशी करत आहे.
त्याचप्रमाणे राणा कपूर आणि त्यांच्या परिवाराच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये 3 मोठी ट्रान्झाक्शन झाली आहेत. ट्रान्झाक्शनमध्ये असणाऱ्या काही कंपन्या DHFL चे प्रमोटर्स चालवतात. एप्रिल चे जुलै 2018 दरम्यान येस बँकेने DHFLला 3,700 कोटींचं कर्ज दिलं आहे. येस बँकेने RKW डेव्हलपर्सला सुद्धा 750 कोटींचं कर्ज दिलं होतं.