मुंबई, 07 जानेवारी: राज्यात कोरोनाचा (Corona) धोका दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण आधीच्या लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) तीनपटीने वाढताना दिसत आहे. त्यातच राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न पडला आहे. यावर महाराष्ट्रात कोविड टास्क फोर्सनी (Covid Task Force) राज्यातल्या लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
जोपर्यंत राज्यातील परिस्थिती गंभीर होत नाही आणि कोविड-19 चे अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सचे सल्लागार सदस्य आणि मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या समन्वय समितीचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी ही माहिती दिली आहे. CNN-News18 शी बोलताना भन्साळी म्हणाले की, लॉकडाऊन होणार नाही. जेव्हा लोक गंभीर स्थितीत रूग्णालयात येऊ लागतील किंवा दीर्घकाळ रूग्णालयात गंभीर अवस्थेत असतील तेव्हाच लॉकडाऊन हा पर्याय असेल.
बहुतेक रुग्ण 2-3 दिवसात बरे होतात
भन्साळी म्हणाले, रुग्णालयात दाखल करणं ही समस्या नाही कारण 'बहुतेक रुग्ण (सध्याच्या लाटेत) लक्षणे नसलेले असतात आणि ते रुग्ण 2 ते 3 दिवसांत बरे होतात. मुंबईत जर 40 हजार केसेस आढळले तरी आम्ही तयार आहोत.
मुंबईत कोरोनाचा उद्रेक, आकडा थेट 20 हजार पार
मुंबईत कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने 15 हजारांचा टप्पा पार केला होता. पण गुरुवारी हाच आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईची प्रसिद्ध झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाबाधितांचा गुरुवारचा आकडा थेट 100 च्या पार गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील मोठे आव्हानं उभी राहिली आहेत. मुंबईत गुरुवारी दिवसभरात तब्बल 20 हजार 181 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 154 रुग्णांमध्ये सध्यातरी कोणतेही लक्षणे दिसत नाहीयत. तर दिवसभरात 1 हजार 170 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिवसभरात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर हा थेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या कालपर्यंत 87 टक्के होती, पण हीच आकडेवारी आज थेट 85 टक्क्यांच्या खाली गेली आहे. तसेच मुंबईतील एकूण बेड्सच्या आकडेवारीपैकी 16.8 बेड्स हे आज भरले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर प्रशासना पुढील आव्हानं आणखी वाढत जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra News