पंढरपूर 10 जानेवारी : आई आणि मुलाचं नातं हे सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ समजलं जातं. त्याची तुलना कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. आई आपल्या मुलासाठी आपला जीवही द्यायला तयार होते. मात्र पंढरपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांनाच धक्का बसलाय. एका दोन महिन्याच्या बाळाला आईने रस्त्यावर टाकून दिलं. कडाक्याची थंडी, पोटात पडलेली भुकेची आग यामुळे ते बाळ आकांत करत होतं. अशा या बाळाला खाकी वर्दीतल्या मातेने आपल्या ह्रदयाशी कवटाळलं आणि रडणारं ते बाळ शांत झालं. खाकी वर्दीतल्या या महिला पोलिसाचं सर्वत्र कौतुक होतंय.
एका दोन महिन्याच्या चिमुकलीला अज्ञात महिलेनं रस्त्यात सोडून दिल्याने वारकऱ्यांचं शहर असलेलं पंढरपूर हादरून गेलंय.
या बेवारस चिमुकलीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र मदतीसाठी कुणीच पुढे येत नव्हतं. शेवटी काही जणांनी या मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. शहरातील चौफाळा चौकातील कृष्णाच्या मंदिराजवळ दुपारच्या वेळेस एक अज्ञात महिला दोन महिन्याच्या चिमुकलीला घेऊन बराच वेळ बसली होती. त्या त्याठिकाणी असलेल्या सचिन व्यवहारे, मनोज वाडेकर, व धैर्यशील काळे यातील विठ्ठला मी लघुशंका करायला जाऊन येते तोपर्यंत या मुलीच संभाळ करा असे म्हणून ती महिला तिथून निघून गेली.
काँग्रेसची चिंता मिटली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर; Exclusive इंटरव्ह्यू
मात्र काही तास झाले तरी महिला त्या लहान मुलीला घेण्यास आली नाही. यामुळे काही युवकांनी चिमुकल्या बाळास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या ठिकाणी त्या मुलीस सांभाळण्याचे काम पोलीस कॉन्स्टेबल सोनाली इंगोले, पोर्णिमा हादगे, प्रियांका मोहिते या करत होत्या.
महिला पोलिसांनी त्या मुलीला बाटलीने दुधही पाजले. त्यामुळे पोलिसांची सह्रदयता पुन्हा एकदा जगासमोर आली. पोलिसांनी बाळाच्या आईविरुद्ध कलम 317 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तर आता त्या मुलीला नवरंगे बालकाश्रममध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. पण शहरात मात्र चर्चा होती ती महिला पोलिसांनी दाखवलेल्या मायेची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.