जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात अलिशान गाडीतून भाजी विकणाऱ्या 70 वर्षांच्या आजीची चर्चा

पुण्यात अलिशान गाडीतून भाजी विकणाऱ्या 70 वर्षांच्या आजीची चर्चा

पुण्यात अलिशान गाडीतून भाजी विकणाऱ्या 70 वर्षांच्या आजीची चर्चा

70 वर्षांच्या आजीच्या या कामामुळे शेतीकडे आणि शेतीपुरक व्यवसायाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 10 जानेवारी : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात नव्या पिढीने शेतीकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जातं. शेतीपेक्षा नोकरीत स्वारस्य मानणाऱ्यांसमोर अनेकांनी नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर अधुनिक पद्धतीने शेती करून नवे आदर्श निर्माण केले आहेत. आता एका भाजी विकणाऱ्या आजीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही भाजी विकणारी आजी नव्या कोऱ्या इनोव्हा कारमधून भाजी विकते म्हणून या फोटोची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. पुण्याच्या असलेल्या या 70 वर्षीय आजी त्यांच्या 15 माणसांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या भाजी विक्रीवर करतात. पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क, सांगवी, पाषाण, औंधसह आजुबाजूच्या परिसरात आजी त्यांच्या मुलासोबत भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. सुमन निवृत्ती भरणे असं आजींचं नाव असून त्यांचा मुलगा संदीप त्यांच्यासोबत या कामात मदत करत असतो. त्यांच्या कुटुंबात 15 जण असून भाजी विक्रीवर संपूर्ण खर्च चालतो. कुटुंबातील सुना, मुलं शेतीत राबतात आणि भाजी पिकवतात. हीच भाजी गाडीमधून जाऊन आजी बाजारात विकतात. गेल्या 30 वर्षांपासून सुमन भरणे भाजी विक्री करतात. काही वर्ष त्यांनी टेम्पोमधून भाजी विकण्याचा व्यवसाय केला. टेम्पो मोठा असल्याने अनेक समस्या येत होत्या. वाहतुकीला अडचण व्हायची. त्यामुळे त्यांनी अलिशान अशी गाडी घेतली आणि त्यातून भाजी विकण्यास सुरुवात केली. यानंतर ग्राहकही वाढल्याचं आजी म्हणतात. आठवड्यात सर्वाधिक व्यवसाय शनिवार-रविवारी होतो असंही आजींनी सांगितलं आहे. पहाटेपासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. घरातली कामं आटोपल्यानंतर जवळच असलेल्या शेतात जाऊन भाजी काढण्यापासून दिनक्रम सुरू होतो. भाज्यांमध्ये बटाटा, कांदा, पालक, मुळा, मेथी या भाज्या पिकवल्या जातात. भाजी काढली की ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि गाडीत भरायची. त्यानंतर गाडी घेऊन हिंजवडी, पाषाण, औंध, सांगवी इथं विकायची. सुमन भरणेंचा मुलगा संदीपने त्यांच्याबद्दल काही माहिती दिली. गेल्या 30 वर्षांपासून भाजी विक्री करताना आजी अनेकदा आजारी पडल्या. पण त्यांनी आजारपणात घरी बसणं स्वीकारलं नाही. आता या वयातही तितक्याच उत्साहाने त्या काम करतात. त्यांच्या कामामुळे शेतीकडे आणि शेतीपुरक व्यवसायाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल असा विश्वास संदीप यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: farmer , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात