पुणे, 11 फेब्रुवारी : लग्नाचं वय उलटत चाललेल्या पुरुषांशी खोटं लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या तरुणींच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं (The Crime Branch of Pune rural police) अटक केली आहे. मावळमधील (Maval) 32 वर्षांच्या तरुणानं केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
मावळ तालुक्यातील तक्रारदार तरुणाचे शिक्षण आणि कामधंदा नसल्यानं लग्न होत नव्हते. त्यावेळी या तरुणींच्या टोळीची प्रमुख ज्योती रवींद्र पाटील हिनं सोनाली जाधव या खोट्या नावानं त्या तरुणाशी संपर्क केला. त्याचबरोबर लग्नाच्या नावाखाली 2.4 लाख रुपये त्याच्याकडून घेतले.
तरुणीच्या वागणुकीवर संशय आल्यानंतर तक्रारदार तरुणाच्या कुटुंबीयांनी तिची चौकशी केली. त्यावेळी तिचं यापूर्वीच लग्न झालं असून तिला दोन मुलं असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी स्थानिक क्राईम ब्रँचमध्ये याबाबत तक्रार केली. क्राईम ब्रँच पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ज्योती रवींद्र पाटील, विद्या सतीश खंडाळे या दोन आरोपींसह आठ तरुणींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(वाचा - Ayodhya: राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल 1000 कोटी रुपये दान)
कशी होती कार्यपद्धती?
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीतील तरुणी लग्नाचं वय उलटत चाललेल्या तरुणाशी लग्नासाठी संपर्क करत असत. त्यांच्याकडून त्या लग्नासाठी 2 ते 3 लाखांची मागणी करत. लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच नववधू घरातील सर्व दागिने आणि पैसे घेऊन पसार होत असे. या प्रकरणात समाजात बदनामी होईल या भीतीने बहुतेक कुटुंब पोलिसांकडे तक्रार करत नसत. या कुटुंबीयांच्या याच असाह्यतेचा फायदा या तरुणी घेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(वाचा - येरवडा जेलबाहेर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी, गुंडाचा वाढदिवस केला साजरा)
अटक करण्यात आलेल्या सर्व आठ तरुणींवर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारे फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी माहिती देण्यासाठी पुढं यावं असं आवाहन क्राईम ब्रँचचे अधिकारी पद्माकर घणवात यांनी केलं आहे.