• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • येरवडा जेलबाहेर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी, अटकेत असलेल्या गुंडाचा वाढदिवस केला साजरा

येरवडा जेलबाहेर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी, अटकेत असलेल्या गुंडाचा वाढदिवस केला साजरा

पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा सहभाग चिंताजनक आहे.

  • Share this:
पुणे, 11 फेब्रुवारी: पुण्यातील येरवडा जेलमध्ये खुनाच्या घटनेत अटकेत असलेल्या AK उर्फ आकाश कुंचले याच्या वाढदिवसानिमित्त पाच फेब्रुवारीला येरवडा जेलच्या बाहेर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडून आतषबाजी केली होती. इतकंच नाहीतर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत पोलिसांना एकप्रकारे खुलं आव्हान दिले. या घटनेमध्ये गुंडाची टोळकी दहशत माजवू पाहत होती, मात्र या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकाश कुंचले याच्या दोन समर्थकांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पण या टोळीतले इतर आरोपी फरारच आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोरोना लॉकडाऊन काळात येरवडा परिसरातील गुन्हेगार नितीन कसबे हा पॅरोलवर येरवडा जेलबाहेर आला होता. पण आकाश कुंचले या गुंडाच्या टोळीने नितीन कसबे या आरोपीचा जेलबाहेर पडताच अवघ्या पाच तासातच खून केला. शादल बाबा चौकात हा खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या आकाश कुंचले नावाच्या गुंडाला अटक करून त्याची येरवडा जेलमध्ये रवानगी देखील केली. पण तरीही त्याचे बगलबच्चे येरवडा परिसरात दहशत पसरवत होतेच. हेही वाचा - चार आण्याची मजा बारा आण्याची सजा! मुलींच्या कॉलेजसमोर बुलेटने फटाके फोडणाऱ्याला 56,000 चा दंड अशातच पाच फेब्रुवारीला रात्री 12 वाजता या टोळीने कहरच केला. आपल्या 'भाई'चा बर्थडे साजरा करण्यासाठी या गुंडांनी थेट येरवडा जेलबाहेरच रात्री बारा वाजता फटाके फोडले. एवढंच नाही त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरलही केला. त्याचं हे कृत्य म्हणजे एकप्रकारे पुणे पोलीसांना खुलं आव्हानच होतं. तसंच गुंडाच्या या कारनाम्यामुळे येरवडा पोलीस स्टेशनची पुरती शोभा झाली. म्हणूनच अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुन्हे शाखेला या गुंडांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा कुठे दोन गुंड गजाआड होऊ शकले. पण तरीही चार जण अद्याप पोलिसांच्या हाती लागेलेले नाहीत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा सहभाग चिंताजनक आहे.
Published by:Akshay Shitole
First published: