मुंबई 20 जून : जून महिन्याचे शेवटचे 10 दिवस राहिलेले असतानाही मान्सून अद्यापही राज्यातील सर्व भागांमध्ये पोहोचलेला नाही. शेतकरी आणि उकाड्याने हैराण झालेले नागरिक आभाळाकडे डोळे लावून बसले असून पावसाची आतुरतेने वाट पाहात असतानाच वरुणराजाने मात्र अद्याप दडी मारलेली आहे. अशातच आता पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला आहे भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील 5 दिवस संमिश्र हवामान राहील. त्यांनी उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. Weather Update Today : अजून किती दिवस उकाडा? चेक करा मुंबईसह 6 शहरांचं तापमान पुण्यातही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तूरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, जालना बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही आज विजाच्या कडकडाटसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणं टाळावं, असा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.