चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी, 26 जुलै : राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकण पट्ट्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, खेड भागात तरी नदी पात्र सोडून ओसंडून वाहून लागल्याने अनेक भागांमध्ये पाणी आलं आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढचे 48 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगडमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर तातडीने आज बुधवारी सतर्कच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर रायगडपाठोपाठ आता रत्नागिरी आणि खेडमध्ये रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तिथेही रेड अलर्ट जारी केला आहे.
Raigad weather alert : रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा, प्रशासनाने घेतला मोठा निर्णयखेड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळांना प्रशासनाकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडून पूर रेषा देखील ओलांडली होती खेडच्या बाजारपेठेतील सफा मशीद चौक परिसरातील काही दुकानांमध्ये नदीचे पाणी शिरलं होतं. जगबुडी नदी बरोबरच नारंगी नदीने देखील पात्र सोडल्यामुळे नारंगी नदीच्या पुराचे पाणी देखील परिसरातल्या शेतामध्ये शिरलं होतं. जगबुडी आणि नारंगी नदीने पूररेषा ओलांडल्यामुळे नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते त्यामुळे खाडीपट्टा विभागातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला होता, खेड दापोली मार्गावर देखील एकविरा नगर या ठिकाणी पाणी साचल्यामुळे खेडचा आणि दापोली आणि मंडणगड तालुक्याची संपर्क तुटला होता मात्र नदीचे पाणी ओसरल्यामुळे पहाटेपासून या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.
खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी कालच्या तुलनेने कमी झाल्यामुळे काल दिवसभर संपर्कात नसलेली गावे पुन्हा संपर्कात आली आहेत. सध्या पुराचा धोका जरी टाळला असला तरी जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीच्या वरूनच वाहत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट असून पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागणार असल्याचं चिन्हं दिसत आहे.