मुंबई, 19 ऑक्टोबर : राज्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातले. राज्याती प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने तडाखा देण्याची शक्यता आहे. आज (ता. 19) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या सरींची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. काल (दि.18) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. आज (ता. 19) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे ही वाचा : Video : वृक्ष संवर्धनाची नवी क्रांती, घरबसल्या मिळेल लावलेल्या झाडांची माहिती
मान्सूनच्या माघारीस पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) परतीच्या प्रवासात शनिवारी (ता. 15) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड, विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागांतून माघार घेतली आहे. उद्यापर्यंतच्या (ता. 20) चोवीस तासांत विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघार घेण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विजांसह पावसाचा इशारा कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री साहेब,आम्हीपण ऊस तोडावा का? शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे मुलाचे थेट शिंंदेंना पत्र
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता. 20) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. 22) आणखी तीव्र होणार असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.