मुंबई, 28 जानेवारी : मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. लवकरच गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला वाहतुकीची परवानगी दिली आहे. या सेवेमुळे गेट वे ऑफ इंडियाहुन बेलापूरला साठ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सोमवार ते शुक्रवार सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे प्रयत्न सुरू होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या सेवेला विलंब झाला.
वॉटर टॅक्सीला परवानगी
अखेर आता या वॉटर टॅक्सी सेवेला मुंबई बंदर प्राधिकरणाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर प्रवास सेवा सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एका फेरीचं नियोजन कंपनीकडून करण्यात आलं आहे.
भाडे किती लागणार?
सोमवार ते शुक्रवार सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोन फेऱ्या गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता बेलापूर जेटीवरून वॉटर टॅक्सी सुटणार आहे. ती सकाळी साडेनऊ वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहोचेल, तर संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे ऑफ इंडियावरून ही वॉटर टॅक्सी बेलापूरला रवाना होणार आहे. ती साडेसात वाजेपर्यंत बेलापूरला पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येकी 300 ते 400 रुपेय एवढं भाडं आकारण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai News