अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 20 जून: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योगा प्राणायाम करणं महत्त्वाचं ठरत असून गंभीर आजारांपासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक योगा प्राणायामाकडे वळताना दिसत आहेत. जागतिक योगा दिना च्या निमित्ताने वर्धा येथील 63 वर्षीय अनंत विठ्ठलराव टिकले यांचा योगा प्राणायाम बद्दलचा अनुभव प्रेरणादायी आहे. दोन हार्ट अटॅक आणि एक अँजिओप्लास्टी झाल्यानंतर योगा प्राणायामामुळे आता ठणठणीत असल्याचं ते सांगतात. आता योगा मार्गदर्शक म्हणून वर्धा जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. अधिकारी पदावर असताना 2 हार्ट अटॅक अनंत टिकले हे वर्धा जिल्हा परिषद कृषी विभाग येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2019 ला ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या आधी 1993 ला टिकले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरी कोणीही नव्हतं. मात्र मित्राने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती केलं. त्यावेळी बरे झाल्यानंतर 2014 मध्ये टिकले यांना हृदयविकाराचा दुसरा तीव्र झटका आला. यादरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली. डॉक्टरांनी स्वतःची काळजी घेण्याची सल्ला दिला. अँजिओप्लास्टी नंतर टिकले यांना स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी योगा प्राणायामाचा ध्यास केला.
स्वस्थ राहण्यासाठी करतात हे प्राणायाम हृदयरोग झाल्यानंतर टिकले हे विविध प्रकारच्या योगा प्राणायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायम, उज्जई प्राणायम, अनुलोम विलोम, भ्रमरी, उदगीथ, ध्यान म्हणजेच मेडिटेशन हे त्यांचे नित्याचे आहे. योगा प्राणायामामुळेच टिकले आता अगदी ठणठणीत असल्याचे सांगतात. रस्ता अपघातामुळे गेला कोमात, योगाने मिळाले नवीन जीवन, असं बदललं मिथुनचं आयुष्य VIDEO योगा मार्गदर्शक म्हणून ओळख अनंत टिकले हे योगा प्राणायामाचा स्वतःला झालेला फायदा अनुभवून त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांनाही योगा प्राणायामाचा सल्ला देतात. जिल्हाभरात विविध ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होऊन योगा प्राणायामाबद्दल ते जनजागृती करत असतात. जिल्ह्यात योगा मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. सन 2004 पासूनच त्यांनी योगा प्राणायामाबद्दल अभ्यास करणे सुरू केले. आता वर्ध्यातील ऑक्सिजन पार्क सोबतच विविध ठिकाणी नित्य योगा शिबिरामध्ये ते सहभागी होतात. हृदयरोगाशी संबंधित असलेल्या रुग्णांनी कोणता व्यायाम योगा किंवा प्राणायाम करावा याबद्दल ते माहिती देत असतात.