वर्धा, 12 जुलै: दरवर्षी 12 जुलै हा दिवस सर्वत्र कागदी पिशवी दिवस म्हणजेच पेपर बॅग डे म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि नैसर्गिक वातावरणास निर्माण होणार्या गंभीर धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम समजून घेणे महत्वाचे आहे. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करा, असा संदेश वर्धा येथील सीएसव्ही सेंटर देत आहे. महात्मा गांधींचा वैचारिक वारसा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं वर्धा जिल्ह्याशी खास नातं आहे. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम 1980 च्या काळापासून सुरू झालेल्या सेंटर ऑफ सायन्स फॉर व्हिलेजेस (सीएसव्ही)च्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी पेपर बॅग मेकिंग युनिट देखील कार्यरत आहे. या ठिकाणी कचऱ्यापासून कागद तयार केला जातो आणि याच कागदापासून आकर्षक अशा कागदी पिशव्या तयार केल्या जातात. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सिएसव्ही सेंटरमध्ये पेपर बॅग बनविण्यास सुरवात झाली. तर मागील 10 वर्षांपासून या पिशव्यांची मागणी वाढली असल्याचं येथील पिशव्या तयार करणारे सांगतात.
यासाठी होते कागदी पिशव्यांची खरेदी अलिकडे प्लास्टिक पिशव्यांबाबत जनजागृती होत आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांना मागणी वाढली आहे. मॉलमध्ये गिफ़्ट पॅकिंग, लग्न कार्य, शो पीस, एक्सिबिशन, मीटिंग, सेमिनार, मेडिकल किंवा इतर घरगुती कार्य यासाठी कागदी पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी सेंटरमध्ये ऑर्डर्स देखील दिल्या जातात. मागणीनुसार सिएसव्ही सेंटर मधील पेपर बॅग बनविणारे कार्यकर्ते ऑर्डर पूर्ण करून देतात. हे कार्यकर्ते बनवितात पेपर बॅग्स पेपर बॅग बनविण्याच्या युनिटमध्ये अरविंद उमाटे, सागर सरोदे, अर्चना परसोडकर हे कर्मचारी कार्यरत आहेत. अतिशय आकर्षक अशा कागदी पिशव्या इथे तयार केल्या जातात. लोकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार या पिशव्या तयार करून दिल्या जातात. एक पिशवी बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात. पावसाळ्यामध्ये या पिशव्यांची काळजी घेणं देखील गरजेचे आहे. पिशव्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते, असे कलाकार सांगतात. कापडी किंवा कागदी पिशव्या वापरणं पर्यावरणाच्या दृष्टीने फार गरजेचा आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक व्हावं ही काळाची गरज आहे. Paper Bag Day 2023: या वस्तू पाहून पडाल प्रेमात, ओळखा कशापासून बनली असेल? कागदी पिशव्यांचे फायदे 1.कागदी पिशव्या वापरणे पर्यावरणपूरक आहे. 2. कागदी पिशव्यांना सहज रिसायकल करता येऊ शकते. 3. कागदी पिशव्या बायोडिग्रेडेबल आहेत. त्यामुळे त्या सहज नष्ट होऊ शकतात. 4. कागदी पिशव्या वापरण्यास स्वस्त आहेत. 5. खराब कागदी पिशव्यांचा वापर तुम्ही घरी खत बनवतांनाही करू शकता. 6. कागदी पिशव्या त्यांच्या सुंदर रंगामुळे आणि त्यावरील प्रिंट्समुळे वापरायला जास्त छान वाटतात.