अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 27 मे: आपण अनेक ठिकाणी प्राणी संग्रहालय बघितलं असेल. प्राणी संग्रहालयामध्ये अनेक प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची त गर्दी असते. मात्र वर्ध्याच्या आर्वी रोडवर असलेल्या पिपरी परिसरातील करुणाश्रमात अपघातग्रस्त, बेवारस, आजारी वन्यजीवांवर उपचार करून त्यांची विशेष काळजी घेतली जाते. पूर्णतः सुदृढ झाल्यानंतर जंगलात सोडून दिले जाते. आतापर्यंत शेकडो प्राण्यांची नोंद इथं आहे. याच करुणाश्रमात जवळजवळ दीड वर्षांपासून दाखल झालेला जग्गू आता 17 महिन्यांचा झालाय. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याची लहानपणापासून वर्ध्याच्या करुणाश्रमात विशेष काळजी घेतली जाते आहे.
आईपासून दुरावलेला बछडा करुणाश्रमात
जवळजवळ दीड वर्ष आधी अवघ्या सहा दिवसांचा असताना वाशिम वन विभागाला एक बिबट्याचा बछडा मरणावस्थेत सापडला. तो आईपासून दुरावला होता. निपचीत पडून असलेल्या अवस्थेत तो सापडला आणि त्याच्या आईची भेट व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी 3 दिवस प्रयत्न केले. मात्र त्याची आई कुठेही आढळली नाही. अखेर एखाद्या प्राणिसंग्रहालय किंवा रेस्क्यू सेंटर मध्ये त्याला दाखल करण्याचा निर्णय झाला. वर्धा येथील करुणाश्रमात त्याला देण्यात आलं. याच ठिकाणी या बछड्याचं 'जग्गू' असं नामकरण झालं.
उपचारानंतर जग्गू पाहतोय जग
बछड्याची तपासणी केली असता त्याला निमोनिया आजार असल्याचं समजलं. त्याच्यावर 15 दिवस उपचार झाले. त्यातून तो बरा झाल्यानंतर डॉक्टरांसमोर पुन्हा एक आव्हान उभं झालं. त्याला 'एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज' हा आजार असल्याचे कळलं. तो स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नव्हता. त्यामुळे करुणाश्रमातील वन्यजीव प्रेमींनी विविध उपचारपद्धती बघून, अनेक तज्ज्ञांना विचारपूस करून त्याच्यावर उपचार केले. तो आता स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतोय आता जग्गू अतिशय सुदृढ असून मनसोक्त खेळतो.
उन्हाळ्यात जग्गूला कुलरची हवा
उन्हाळ्यात माणसांसह वन्य प्राण्यांनाही उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून जग्गूला कुलरच्या हवेत ठेवण्यात येत आहे. दिवसभर आणि रात्री तो कुलरच्या हवेत राहतो. सायंकाळी त्याला मनसोक्त खेळण्यासाठी मोकळे केले जाते. जग्गूच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करण्यात येत असून रोज तीन ते चार किलो मांस त्याला दिले जाते.
Wardha News: महाराष्ट्रातलं असं मंदिर पाहिलं नसेल, इथं जगभरातून पर्यटक येतात! VIDEO
म्हणून जग्गूला जंगलात मुक्त करणं अशक्य
जग्गू आता करुणाश्रमातील कुटुंबाचा एक लाडका सदस्य झाला आहे. त्याला पुन्हा जंगलात सोडण्याची प्रक्रिया फार मोठी असून शासनाने निर्णय घेतल्याशिवाय जग्गूला मुक्त करणे शक्य नाही. जग्गू लहानपणापासून जंगलाच्या बाहेर वाढला असल्याने आता त्याला पुन्हा जंगलात सोडणे म्हणजे मानवी वस्तीतील लोकांना तसेच जग्गूसाठी देखील प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे त्याला सध्या करुणाश्रमातच ठेवण्यात आले आहे.
वन्यजीव प्रेमींच्या डोळ्यात समाधान
करुणाश्रमातील सर्व वन्यजीवप्रेमी 'जग्गू'वर खूप प्रेम करतात. येथील सदस्यांना तो काहीही करत नाही. जग्गू त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. एकेकाळी स्वतःच्या डोळ्याने न बघू शकणाऱ्या एका बिबट्याच्या चिमुकल्या बछड्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. आता त्याला मनसोक्त खेळताना बघून करुणाश्रमातील वन्यजीव प्रेमींच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news, Wild animal