वर्धा, 25 जुलै: वर्ध्यात बॅचलर्स रोड वर ऐटीत उभे असलेले पाच पक्षी सर्वांचं लक्ष वेधून घेताहेत. ठिपके वाला पिंगळा, पांढऱ्या छातीचा धिवर, तांबट, कापशी घार आणि निलपंख या पक्षांचे आकर्षक स्टॅच्यु येणाऱ्या जाणाऱ्यांना भुरळ घालतील असेच आहेत. हे पक्षी याठिकाणी का लावले असतील? आणि हे निवडक 5 च पक्षी का? असा प्रश्न वर्ध्यात येणाऱ्या अनेकांना पडत असेल. त्यामागे कारणही विशेष आहे. शहर पक्षासाठी झाली निवडणूक आपण राजकीय पक्षांच्या निवडणुका होताना बघतो. आपण आपल्या गावचा पुढारी निवडून देतो. त्याचप्रमाणे आपल्या शहराचा एक पक्षी असावा यासाठी वर्ध्यातील बहार नेचर फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि वर्धा नगर परिषदेच्या सहकार्याने 2018 साली थाटात निवडणूक पार पडली. तब्बल 52 हजार लोकांनी या 5 पक्षांपैकी निलपंख या पक्षाला वर्धेकरांचा लाडका पक्षी म्हणून निवडून दिलंय.
22 ऑगस्ट शहर पक्षीदिन 23 जून ते 15 ऑगस्ट 2018 या कालावधीत पक्षी निवडणुकीचं मतदान चाललं. 22 ऑगस्टला मतमोजणी सुरू झाली. दिवसभर मतमोजणी झाल्यानंतर संध्याकाळी निलपंख हा पक्षी वर्धा शहर पक्षी म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. तब्बल 52 हजार लोकांनी निलपंख पक्षाला वर्धा शहर पक्षी म्हणून निवडून देण्यासाठी मतदान केलं. 22 ऑगस्ट हा दिवस तेव्हापासून शहर पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत पुतळे जेष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी निलपंख पक्षी वर्धा शहर पक्षी म्हणून घोषित केला होता. या पक्षी निवडणुकीत उमेदवार असलेल्या 5 पक्षांचे स्टॅच्यू 1-2 वर्षांमध्ये सेवाग्राम विकास अरखड्या अंतर्गत वर्ध्यातील पावडे चौक ते आर्वी नाका दरम्यानच्या बॅचलर्स रोडवर लावले आहेत. तसेच निलपंख या पक्षाचा भंगार पासून बनलेला आकर्षक स्टॅच्यू देखील दत्तपूर जवळ वर्ध्यात येणाऱ्यांचे पंख पसरून स्वागत करतोय. भारत छोडो आंदोलनाआधी महात्मा गांधी या मंदिरात झाले होते नतमस्तक लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल विशेष म्हणजे या ऐतिहासिक पक्षी निवडणुकीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे. वर्ध्यातील या आगळ्यावेगळ्या निवडणुकीची कौतुकमय चर्चा दुरवरपर्यंत पसरली होती. वाढत्या सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येतोय. त्यामुळे पक्षी संवर्धनाच्या उद्देशाने वर्ध्यात ही ऐतिहासिक निवडणूक घेतली गेली. या निवडणुकीला यावर्षी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या पक्षी संवर्धन ही गरज असून वर्धेकरांचं पक्षीप्रेम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.