वर्धा, 26 ऑगस्ट : एकीकडे राज्यात बैल पोळ्याचा सण साजरा होत असताना दोन वाईट बातम्या समोर आल्या आहेत. एक बातमी वर्धा जिल्हा तर दुसरी बातमी ही औरंगाबाद जिल्ह्यातून आली आहे. वर्धा जिल्ह्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे गोठ्याला अचानक आग लागली. या दुर्घटनेत दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. तर गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे घडली. धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेतीउपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे. गुरूवारी पोळा सणाचे औचित्य साधून रात्रीला गोठ्यात बांधून असलेल्या बैलांचे खांद शेकल्यावर शेतकरी घरी परतला. पण नंतर अचानक लागलेल्या आगीत गोठ्यातील विविध साहित्य जळून कोळसा झाले. शिवाय गोठ्यातीलच दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. हेही वाचा - नाशिकमध्ये बड्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांचं घबाड! शंभर कोटींच्या मालमत्तेचा संशय पैठणमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू - तर दुसऱ्या घटनेत पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. बाळू रामनाथ गवळी (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल 25 ऑगस्टला दुपारच्या सुमारास पैठण तालुक्यातील नारायणगाव घडली. आज शुक्रवारी पोळा सण आहे. त्यामुळे एक दिवस आधीच म्हणजे काल बैल धुण्यासाठी बाळू गवळी दुपारच्या सुमारास गावाजवळच्या नदीवर गेला होता. बैल धुताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.