मुंबई, 26 ऑगस्ट : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा आणि मुंबई बंगळुरु महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना ही सूट देण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत ही टोलमाफी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सवानिमित्त 20 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी, म्हणून परिवहन विभागाने टोल पास जारी करावेत, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - मोठी बातमी! अनिल देशमुखांची जेलमध्ये प्रकृती बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल
यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. तर 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणेश उत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्यासाठी खासगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. आता या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट मिळणार आहे.
शासन परिपत्रकात काय?
कोकणात 2022 च्या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना टोलमाफी शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या दरम्यान, मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग (48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (66) वरिल व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना / वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.
यासोबतच "गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन" अशा स्वरुपाचे स्टीकर्स स्वरुपाचे टोलमाफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर त्यावर नमूद करुन ते स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच या पासेस परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.
ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उपसचिव (खा. र. 1) सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मंत्रालय, मुंबई. ३२ यांना माहितीकरिता सादर करावी. पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना जाहीर प्रसिध्दी करावी. तसेच या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचा संकेताक 202208261358408418 असा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Toll, Toll naka