वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 5 फेब्रुवारी : सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने बेटी बचाओ-बेटी पढाओ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार वर्धा जिल्ह्यातील पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. या योजनेअंतर्गत मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 7.6 टक्के इतके व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यासोबतच जमा रकमेवर चक्रवाढ व्याज खातेदाराला दिले जाते.
वर्धा जिल्ह्यात 183 पोस्ट ऑफिस आहेत. यामधील 27 शहरी भागात तर 156 ग्रामीण भागात आहेत. ही योजनेत पोस्टात 2015 पासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत या योजनेतून जिल्ह्यात 25 हजार 688 पालकांनी मुलींचे खाते उघडले आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र सुकन्यांचा शोध घेऊन त्यांची खाती उघडण्यात येणार आहे. यासाठी पोस्ट विभागाच्या वतीने 9 आणि 10 फेब्रुवारीला खाते उघडण्यासाठी घर घर मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती पोस्ट विभागाच्या वतीने दिली आहे.
250 रुपयात उघडा खाते
या योजनेत किमान 250 रुपये तर कमाल 1.5 लाख इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता. तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा वर्षातून हवे तेव्हा रक्कम जमा करता येते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी 50 टक्के रकमेची उचल करता येते. मध्येच खाते बंद झाल्यास जमा रकमेवर व्याज चालू राहणार आहे. यातील गुंतवणुकीला आयकरातून देखील सवलत देण्यात आली आहे. इतकं नव्हे तर व्याज काढून घेतल्यास आणि अंतिम रक्कम जेव्हा हातात येते त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
ही कागदपत्र आवश्यक
आई किंवा वडिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मुलीचे तीन फोटो, आई किंवा वडिलांचे तीन फोटो, मुलीचे आधार किंवा जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.
असा मिळणार परतावा
एखाद्या पालकांनी मुलीचे वय एक वर्ष असताना प्रत्येक महिन्याला किमान एक हजार रुपये जमा केले तर वर्षाला बारा हजार होतात. मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत पाच लाख दहा हजार 373 रुपये जमा होतील. यातील एक लाख 80 हजार ही पालकांची गुंतवणूक असेल तर तीन लाख 30 हजार 373 रुपये व्याज असेल.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अनोखी तयारी, Group study नं वाढवली अभ्यासाची गोडी!
खाती उघडण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडून 10 वर्षांपर्यंतच्या मुलीची यादी मागितली आहे. नऊ आणि 10 फेब्रुवारीपासून घरोघरी मोहीम राबवून याचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न पोस्टाच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती वर्धा पोस्ट ऑफिसचे अधिक्षक हरी बाबू बंदाना यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Post office, Wardha