वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा,
वर्धा, 7 मार्च : भारतात बालविवाह ही मोठी सामाजिक समस्या आहे. विवाहानंतर चूल आणि मूल या पुरतेच मुलींचे आयुष्य मर्यादित होते. परंतु, विवाहानंतर पती जोतिबांच्या रुपात भेटला तर पत्नी सावित्री होण्यास वेळ लागत नाही. काहीसा असाच प्रवास वर्धा जिल्ह्यातील डॉ. रत्ना देवचंद चौधरी नगरे यांचा आहे. आठवीत असताना वयाच्या 13 व्या वर्षी रत्ना यांचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर त्यांनी आठ विषयात एम.ए. आणि एम.फिल., पीएच.डी.चे शिक्षण घेतले. त्यांच्या या प्रवासात पती दशरथ नगरे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
राजस्थानची लेक वर्ध्याची सून
डॉ. रत्ना देवचंद चौधरी या मुळच्या राजस्थानमधील आहेत. समजायला लागण्याच्या वयात म्हणजेच आठवीत असतानाच त्याचा विवाह झाला. राजस्थानची लेक वर्ध्याची सून झाली. पती दशरथ नारायण नगरे हे शिक्षक होते. राज्य सुटले आणि गांधी, विनोबांच्या भूमिचा सहवास लाभला असतानाच शिक्षणाची ओढ कायम होती.
जोतिबांमुळे घडली सावित्री
शिक्षक असणारे दशरथ नगरे हे जोतिबांप्रमाणे पत्नीच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे रत्ना यांचे शिक्षण पुढेही सुरू राहिले. लग्नानंतर रत्ना यांनी स्थानिक यशवंत महाविद्यालयात मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यास करून बी.ए.ची पदवी मिळवली. संधीचे सोने करत त्यांनी डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण घेतले आणि विविध सामाजिक संस्थांचे 35 पुरस्कार मिळाले. या प्रवासात त्यांना पती दशरथ नगरे यांची साथ लाभल्याचे रत्ना चौधरी सांगतात.
अडचणींचा सामना
लग्नानंतर शिक्षण घेत असताना अनेक कौटुंबीक समस्यांचा सामना करावा लागतो. तशाच अनेक समस्यांना रत्ना चौधरी यांना सामोरे जावे लागले. बी.ए.ची परीक्षा आली तेव्हा त्यांना नुकतेच बाळ झालं होतं. 15 दिवसांचं बाळ असताना 45 डिग्री सेल्सिअर तापमानात त्यांनी बाळाला सोडून पेपर दिला. अशी विविध संकटे येत असतानाही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही.
विविध विषयांत उच्च शिक्षण
रत्ना चौधरी यांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे त्यांनी एकामागून एक विषयांचा अभ्यास केला. बी.ए. नंतर त्यांनी एम.ए., बी.एड. आणि पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर पदवी घेण्याचा सपाटाच लावला. मराठी, हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र विषयांत एम.ए. केले. तर एम.एड., एम.फिल.ची पदवीही मिळवली. तसेच डी.व्ही.जी, डी.एस.एम.सह शिक्षणशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. यातील काही परीक्षा त्यांनी मुलीसोबत दिल्याचे सांगितले.
विविध पुरस्कारांनी सन्मान
डॉ. रत्ना चौधरी या सध्या महाविद्यालय आणि विविध विद्यालयांतील किशोरवयीन मुलींना समुपदेशन करत असतात. तसेच पुलगाव येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक मंडळ पुणे, हिंदी अभ्यासगट सदस्य म्हणून 2020 पर्यंत त्यांनी काम पाहिले. ओपन विद्यालय पुणे, हिंदी अभ्यासक्रम सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या. आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक राष्ट्रीय संस्थांकडून 35 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाकडून आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा शैक्षणिक प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International Women's Day, Local18, Success story, Wardha, Wardha news