अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 7 मार्च : स्पर्धा परीक्षा विशेषत: यूपीएससी देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेत परीक्षा देण्याबाबत संभ्रम असतो. स्पर्धात्मक युगात इंग्रजीच्याच आधारावर आपण टिकून राहू असा त्यांचा समज असतो. गेल्या काही वर्षांमध्ये हा समज अनेक अधिकाऱ्यांनी खोटा ठरवला आहे. त्यापैकीच एक आहेत सोलापूर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त शितल तेली-उगले. शितल यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचा आजवरचा प्रवास उलगडून सांगितला आहे.
60 वर्षांमध्ये पहिल्या
सोलापूर महापालिकेची स्थापना ही 1963 रोजी झाली. पालिकेला प्रशासकीय स्वरूप मिळून साठ वर्ष उलटून गेली परंतु साठ वर्षाच्या इतिहासात पालिकेला प्रथमच पहिल्या महिला आयुक्त म्हणून शितल तेली-उगले यांची नियुक्ती झाली. त्यांनी सोलापूरमध्ये हा पदभार स्विकारताच इतिहास रचला आहे. त्यानंतर प्रशासकीय कामातील विद्वत्ता, सहकाऱ्यांना सामावून घेत घेतलेले निर्णय आणि सर्वसामान्यांची प्रथम सोय या आधारावर त्यांनी अगदी कमी कालावधीमध्ये ऐतिहासिक सिद्धेश्वर नगरीत स्वत:चा ठसा उमटवला आहे.
मराठीत परीक्षा!
शितल यांनी पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी पुणे विद्यापीठात गोल्ड मेडल पटकावले होते. पदवीनंतर युपीएससी परीक्षेतही त्यांनी यशाची घौडदौड कायम ठेवली. त्यांची दोन वेळा भारतीय उत्पादन आयकर सेवेत निवड झाली होती. त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.
सोलापूरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांना मोठा बहुमान मिळाला. पण,' ज्या खुर्चीवर आम्ही बसतो त्याला जेंडर नसतं. महिला किंवा पुरुष आयुक्त दोघांसमोरही येणारी आव्हानं सारखीच असतात,' असं शितल यांनी Local18 शी बोलताना स्पष्ट केलं.
स्वप्नपूर्तीसाठी नोकरी सोडली, नातेवाईकांचे टोमणे खाल्ले पण आज सर्वजण करतात सलाम! Video
'तो' प्रसंग विसरणार नाही!
शितल यांनी रायगड जिल्हा अधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलं आहे. त्यांच्या कार्यकाळातच 2 ऑगस्ट 2016 रोजी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पूरात वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे तसंच मृतांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे होतं. त्यावेळी पहिला मृतदेह हा थेट अरबी समुद्रात मिळाला. कारण नदीच्या प्रवाहात तो समुद्रात वाहून गेला होता. काही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची DNA टेस्ट करावी लागली. हा सर्व अनुभव कधीही विसरता येण्यासारखा नाही, असं शितल यांनी सांगितलं.
यशाचं श्रेय कुणाला?
शितल यांचे पती डॉ. बसवराज तेली हे सांगली पोलीस अधिक्षक आहेत. त्यांचा मुलगा आदित्य शाळेत आहे. आई संजीवनी उगले आणि वडिल शहाजीराव उगले यांच्यामुळेच त्यांनी अनेक संकटावर मात केली. आईनेच आपल्या मुलाची जबाबदारी घेतली असल्याचं त्या सांगतता. शितल यांची एक बहिण डॉक्टर असून भाऊ इंजिनिअर आहे.
बँकेतील नोकरी सोडली, शेतकरी कन्या मुलींमध्ये राज्यात पहिली, पाहा Video
शितल तेली-उगले यांची कारकिर्द
-2007-08 भारतीय महसूल सेवा - आयकर.
-2009 भारतीय प्रशासकीय सेवेतील निवड - महाराष्ट्र केडर.
-2009-11 सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर म्हणून नियुक्ती.
-2011-12 सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर.
-2012-15 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
-2015-17 जिल्हाधिकारी, रायगड.
-2017-18 अतिरिक्त. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.
-2018-21 महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि अध्यक्ष,
-2021 ते 2023 पर्यंत - आयुक्त (वस्त्र), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- सध्या सोलापूर महापालिक आयुक्त आणि स्मार्ट सिटी सिईओ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International Women's Day, Local18, Solapur