वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 30 मार्च : लहरी निसर्ग, कमी होत चालेली सुपीक जमीन आणि शेतमालाच्या भावातील होणारे चढ-उतार यामुळे शेती करणे हे अधिक आव्हानात्मक बनलंय. बदलत्या काळात अधिक कल्पतेनं नव्या उत्पादनांची लागवड केली तर शेतीमध्ये यशस्वी होता येतं. त्यामुळे शेतकरी नवीन प्रयोग करत असतात. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यानं चक्क काळा गहू पिकवलाय. या प्रकारची लागवड करणारा तो संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शेतकरी आहे.
काय आहेत वैशिष्ट्यं?
राजेश डफर असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या जळगाव या गावाचे रहिवाशी आहेत. डफर यांनी पहिल्यांदाच काळ्या गव्हाची लागवड केलीय. 'सामान्य गव्हाच्या पेरणी प्रमाणेच काळ्या गव्हाची लागवड केली जाते. 40 किलो बियाण्यांची एक एकरमध्ये पेरणी केली. आश्चर्य म्हणजे एक एकरात तब्बल 18 क्विंटल काळ्या गव्हाचं उत्पादन झालं, ' अशी माहिती राजेश यांनी दिली.
नॅशनल अॅग्री फुड बायोटेक्नॉलजी इन्स्टिट्यूज मोहाली येथील शास्त्रज्ञ डॉ. मोनिका गर्ग यांनी सात वर्षांच्या संशोधनानंतर काळ्या गव्हाचा शोध लावला आहे. काळ्या गव्हाला भारतीय कृषी संशोधन परिषदेने याला मरू गहू असे नाव दिले आहे, तर राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेने नाबी एम.जी. असे नाव दिले आहे. काळ्या गव्हातील फायबर घटकामुळे कॅन्सर, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर समजले जाते.
रेशीम शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, एका एकरात कमावतोय तब्बल 6 लाख!
शोधनिबंधातही उल्लेख
गव्हाच्या या नव्या प्रकारात देशभर संशोधन सुरू आहे. सायन्स डायरेक्ट डॉट कॉम या जर्नलमध्ये या विषयावर आलेल्या शोधनिबंधानुसार, 'काळ्या गव्हात प्रथिने सामग्री, आहारातील फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फ्लेव्होनॉइड (TFC) आणि फिनोलिक सामग्री (TPC) अँटिऑक्सिडंट क्रिया पारंपरिक पिवळ्या गव्हाच्या तुलनेत जास्त असते. या गव्हामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, जळजळ, कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणापासून संरक्षण होते.
टाइप 2 आणि ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर (TNF)-α मधुमेह मेल्तिसमुळे प्रेरित इंटरल्यूकिन (IL)-6 ची वाढ या गव्हाच्या आहारामुळे रोखली जाते, असंही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
किती आहे किंमत?
एक किलो काळ्या गव्हाची किंमत 70 रुपये असून तो सामान्य गव्हापेक्षा साधारण चार पट महाग आहे. या गव्हाचं पीठ सुमारे 125 ते 130 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
'काळ्या गव्हाचे पौष्टिक मूल्य सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त असते. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाण असते जे मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. आर्वी तालुक्यातील जळगाव येथील काही शेतकऱ्यांने प्रायोगिकरित्या करत असले तरी, गव्हाचे बियाणे अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर बियाणे मागवावे. सामान्य गव्हाच्या तुलनेत या काळ्या गव्हामध्ये ट्रायव्हरिंग जास्त असते, त्यामुळे सामान्य गव्हाच्या तुलनेत पेरणीसाठी कमी जागा लागते,' अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Wardha