वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 9 फेब्रुवारी: मनुष्यप्राणी जेव्हा जीवनात केवळ स्वतः साठी झिजतो त्यास सामान्य जीवन म्हटले जाते. मोह मायेचा त्याग करून मनुष्य आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्याच्या कामी येतो. तेव्हा 'देह होतो चंदनाचा झाला' असे म्हटले जाते. अशीच काहीशी घटना वर्धा नजीकच्या हमदापूर गावात घडली आहे. गावातील चंद्रकला दौलत ढबाले यांनी श्री संत शामगीर महाराज देवस्थान कमिटीला ९३ हजार रुपये दान दिले आहेत. विशेष म्हणजे ढबाले यांनी मोलमजुरी करून जमवलेले पैसे दान केल्याने त्यांच्या दातृत्वाची चर्चा आहे.
माणूस वृद्धापकाळाची सोय व्हावी म्हणून काही पैसे साठवून ठेवतो. चंद्रकला ढबाले यांनीही मोलमजुरी करून ९३ हजारांची रक्कम ठेवली होती. परंतु, त्यांची काही काळापूर्वी मंदिराला दान देण्याची इच्छा होती. तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मोलमजुरी करून पैसे जमवले. हे पैसे सत्कार्यासाठी लागतील या भावनेने त्यांनी गावातील श्री संत शामगीर महाराज देवस्थान कमिटीला मंदिर निर्मितीसाठी दान दिले. त्यांच्या या निरपेक्ष दानी वृत्तीचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांची कमाल; एका वर्षात सोयाबीनची तब्बल 3 पिके, पाहा Video
दानाची महती अगाध
खरे पाहता मनुष्य जीवनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. 'दान' हे देखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे. तुम्ही या विशाल जगतासाठी जे कराल, ते कधीही फुकट जाणार नाही आणि हृदय ओतून द्याल तर त्याची किंमतच करता येणार नाही. कारण खरा आनंद हा केवळ देण्यात असतो. म्हणूनच दानाची महती अगाध आहे, असे म्हटले जाते. तसेच एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, असेही आपल्याकडे म्हटले जाते. त्यामुळे निरपेक्ष भावनेने दिलेल्या दानाची महती सर्वच धर्म आणि संस्कृतींमध्ये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news