वर्धा, 23 जुलै : आठवीपासून पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील तसेच अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये (government hostel) प्रवेश दिला जातो. असे जिल्ह्यात एकूण 10 वसतिगृह असून, या वसतिगृहांमध्ये 850 प्रवेश क्षमता आहे. यात 250 जागा रिक्त आहेत. वसतिगृहात 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज देखील करू शकणार आहेत.
आठवीपासून पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहात गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत.
हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त
जिल्ह्यातील एकूण 10 शासकीय वसतिगृहात 850 जागा उपलब्ध असून येथील प्रवेश अगदी मोफत असणार आहे. 2022-23 या सत्राचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. यासाठी रिक्त जागेवर अर्ज मागवले जात असून वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यात आठ तालुके आहे. शासकीय अनुदानित वसतिगृहात एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जाणार असून यात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांना पुरवली जाते.
कोणत्या ठिकाणी किती जागा
ठिकाणाचे नाव | वसतिगृहाची संख्या | एकूण जागा | रिक्त जागा |
वर्धा | 2 | 150 | 36 |
पुलगाव | 2 | 150 | 50 |
आर्वी | 1 | 75 | 27 |
हिंगणघाट | 1 | 75 | 24 |
उमरी मेघे | 1 | 100 | 24 |
देवळी | 1 | 100 | 31 |
नालवाडी | 1 | 100 | 22 |
आष्टी | 1 | 100 | 36 |
अर्ज कोठे करणार ?
शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असून समाज कल्याण विभागासह आदिवासी विभागाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करता येतो. यासाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेयर, डोमिसाईल आदी. कागदपत्राची पूर्तता करावी लागते. अर्ज ऑनलाईनसह ऑफलाईनही करता येतो. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन विद्यार्थी ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://swayam.mahaonline.gov.in या लिंकचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी वसतिगृहाच्या 9689358970, 8007573815 या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.
हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO
अटी व शर्ती
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अटी व शर्ती लागू असतील. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इयत्ता 8 वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल, 31 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासह आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता असू शकते त्याची पूर्तता विद्यार्थांना करावी लागेल.
अर्ज भरताना टाळा या चुका
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना आपल्या नावात अक्षरांच्या चुका करू नयेत. फार्म भरताना मोबाईल नंबर बरोबर भरावा, अर्ज भरताना चुकीची माहिती देऊ नये, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक प्रत प्रवेश घेत असलेल्या वसतिगृहात द्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Student, Wardha, Wardha news